मोकाट गायीच्या हल्ल्यात पाच जखमी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 मे 2018

नाशिक रोड - नाशिक रोड परिसरात मंगळवारी (ता. ८) एका मोकाट गायीने धुमाकूळ घातला. रस्त्यात जो दिसेल त्याला गायीने धडक दिली. गायीने वाहनांना धडका देऊन नुकसान केले. या हल्ल्यात वाहनचालक, मुले, वृद्ध, महिला असे चार ते पाच जण जखमी झाले. अखेर अग्निशमन दल, आरोग्य विभाग आणि समाजसेवकांच्या तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर गायीला पकडण्यात यश आले अन्‌ नागरिकांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला. 

आर्टिलरी सेंटर रोडवरील आनंदऋषीजी शाळा परिसरात गायीने रस्त्यावर दिसेल त्याला धडक मारण्यास सुरवात केली. गवळीवाड्याकडे तिने मोर्चा वळविला. तिथे काही नागरिकांना जखमी केले. नंतर माणिकनगर, धोंगडेनगरकडे मोर्चा वळविला व गाय आणखीनच चवताळली. तिने रुद्रावतार धारण केला. कोणालाच जवळ येऊ देईना. नागरिकांनी नगरसेवक रमेश धोंगडे, अग्निशमन दलाला दूरध्वनी करून पाचारण केले. एस. बी. निकम, एस. एस. नागपुरे, एस. एस. पगारे, आर. आर काळे, बी. के. कापसे बंबासह दाखल झाले. स्वच्छता निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले, विजय जाधव, जर्नादन घंटे आरोग्य कर्मचाऱ्यांसह हजर झाले. 

अग्निशमन दलाने पाथर्डी फाटा येथील आवास संस्थेचे अध्यक्ष गौरव क्षत्रिय या प्राणिमित्राला बोलावून घेतले. आलोक शर्मा, सोहम डुंबरे, सोनाली सालकर, नामदेव धोंगडे आदी नागरिक मदतीला धावले.

कर्मचाऱ्यांसह नागरिकांना फोडला घाम
गाय धोंगडेनगरमध्ये आली असता, स्वामी समर्थ मंदिराजवळील घराजवळ तिला दोरीच्या सहाय्याने जखडण्यात यश आले. दोरी तोडण्याचा प्रयत्न ती करू लागली. तापलेल्या रस्त्यावर पडल्यावर नागरिकांनी पाणी टाकले. मात्र, ती खवळली. पायात दोरी असतानाही ती उठू लागली. सुटकेच्या नादात ती अनेकदा पडून गंभीर जखमी झाली. थोडी शांत होताच पुन्हा ती हल्ला करायची. त्यामुळे तिला पकडणे अवघड झाले. कर्मचाऱ्यांनी गायीच्या तोंडाची दोरी खांबाला आवळून धरली, तर काहींनी पायात दोरी अडकवून खाली पाडले. श्री. क्षत्रिय यांनी तिला इंजेक्‍शन देऊन भूल देण्यात आली. अखेर पाय, डोके बांधून तिला उचलून गाडीत चढविण्याचा प्रयत्न केला. मात्र, गायीने सुटकेची जोरदार धडपड केल्याने हा प्रयत्न फसला. अखेर बांधकामाच्या दोन बल्ल्या आणून तिला गाडीत चढविण्यात आले. कर्मचाऱ्यांचाच नव्हे, तर बघणाऱ्यांचाही तिने घाम काढला. तिला आवास संस्थेच्या पाथर्डी येथील उपचार केंद्रात नेण्यात आले.

Web Title: five injured by cow attack