टोल नाक्‍यावर पाचशेच्या नोटा स्वीकारणार 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 डिसेंबर 2016

नाशिक - केंद्राने महामार्गावरील टोलवसुली उद्या (ता. 2)पासून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. वाहतूक व्यवस्थेला नोटाबंदीचा फटका बसू नये म्हणून टोल नाक्‍यावर 15 डिसेंबरपर्यंत पाचशेच्या नोटा स्वीकारण्यास परवानगी देण्यात आली आहे. निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील टोलनाका चालकांची बैठक घेऊन वाहनधारकांकडून पाचशेच्या जुन्या नोटा स्वीकारण्याचे निर्देश दिले. 

राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी 2 डिसेंबरपर्यंत टोलमाफीला वाढ दिली होती. ही मुदतवाढ उद्या (ता.2) संपत असल्याने टोलवसुली पुन्हा सुरू होत आहे. एकीकडे बॅंकांमध्ये सुट्या पैशांचा खडखडाट असल्याने बॅंकांकडे 100, 50 रुपयांच्या नोटांचा तुटवडा आहे. चलनात दोन हजारांची नोट उपलब्ध असली तरी दोन हजार रुपयांचे सुटे मिळत नसल्याने नोट असूनही गरज भागत नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे टोल नाक्‍यांवर पाचशेच्या जुन्या नोटा स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय, महामार्गावरील टोल नाक्‍यावर पुरेसे स्वाइप मशिन बसवून वाहनधारकांची गैरसोय टाळावी, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत. 

जिल्ह्यात घोटी, चांदवड, इगतपुरी येथील टोल नाक्‍यांवर उद्यापासून टोल स्वीकारताना पैशांवरून उद्‌भवणारे वाद टाळण्यासाठी पोलिस बंदोबस्ताची मागणी या वेळी करण्यात आली. प्रशासनाकडूनही वाहनधारकांशी सभ्यतेने वागण्याच्या सूचना देण्यात आल्या. टोलनाका चालकांना सुटे पैसे उपलब्ध करून देण्याबाबत बॅंक अधिकाऱ्यांशी प्रशासन चर्चा करणार आहे. सुट्यांचा प्रश्‍न सोडविण्यासाठी केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाने टोलचे पैसे देण्यासाठी कुपन वापराचा पर्याय पुढे आणला आहे. मात्र, त्याबाबत केंद्राचा विचार सुरू असला, तरी कुपन वापराबाबत अद्याप कुठल्या सूचना आलेल्या नसल्याने, कुपनाचा अद्याप वापर होणार नसल्याचे सांगण्यात आले. त्यासाठी वाहनधारकांना सुटे पैसे उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.

Web Title: Five notes at the toll accept