दहामधील पाच जणी पीसीओडीने त्रस्त!

70141662.png
70141662.png

नाशिक : बदलती जीवनशैली, धकाधकीच्या जीवनात वाढलेला ताणतणाव, पौष्टिक आहाराचा अभाव आणि व्यायामाची कमतरता यामुळे महिलांमध्ये "पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज"ची (पीसीओडी) समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. 
पीसीओडी हा अंडाशयाचा आजार असून, यामध्ये अंडाशयाला अनेक ठिकाणी गाठी येतात आणि त्यामुळे हार्मोन्सचा समतोल बिघडतो. सरासरी दहापैकी पाच महिला या आजाराने त्रस्त असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे महिलांना मधुमेहाबरोबरच रक्तदाब आणि कर्करोगाचाही धोका असल्याचे दिसून आले आहे. 

पीसीओडीने शरीरात होणारे बदल...

पीसीओडीची समस्या 18 ते 25 वयोगटांतील तरुणींमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. या आजारात हार्मोन्समध्ये बदल होतात. त्यामुळे शरीरात इन्सुलिन योग्य प्रमाणात तयार होत नाही. बॉडी मास इंडेक्‍स (बीएमआय), इन्सुलिन, ग्लुकोज आणि ट्रायग्लिसराइड या गोष्टी पीसीओडीशी संबंधित असतात. पीसीओडी रुग्णांमध्ये इन्सुलिन रेसिस्टंट (रक्तात सारखेचं प्रमाण कमी) असते. शरीरात इन्सुलिन तयार होत नसल्यानं या महिलांना टाइप-2 मधुमेह होण्याचा धोका सर्वाधिक असतो. हा आजार बऱ्याच अंशी अनुवंशिक आहे. ज्या कुटुंबात मधुमेह या आजाराचं प्रमाण जास्त आहे, त्या कुटुंबातील मुलींना हा आजार होण्याची शक्‍यता अधिक आहे. 


आजाराची लक्षणे...
 
- मासिक पाळीतील अनियमितता 
- मासिक पाळीदरम्यान स्राव कमी होऊन कालांतराने पाळी बंद होणे 
- अनियमित मासिक पाळीमुळे येणारे वंध्यत्व 
- मानेवरची त्वचा जाडसर होऊन काळी दिसणे 
- चेहरा, हातापायांवर आणि पोटावर लव येणे 
- केस गळण्याचे प्रमाण वाढणे 

ही घ्यावी काळजी...


- आहाराचे नियम पाळताना तंतूमय पदार्थाचं सेवन जास्त प्रमाणात करायला हवे. त्यामुळे सतत क्रियाशील राहण्यास शरीराला ऊर्जा मिळते. 
- फळांचं सेवन करणेही महत्त्वाचे आहे. कारण फळांमुळे लठ्ठपणा, हृदयरोग आणि इतर आरोग्यविषयक समस्यांवर नियंत्रण मिळवता येतं. 
- वजन आटोक्‍यात ठेवणं, प्रथिनयुक्त आणि कर्बोदक असलेले पदार्थ सेवन करणं, संतुलित आहार घेणं आणि नियमित व्यायाम करणं.
  या त्रिसूत्रीच्या आधारावर पीसीओडीवर नियंत्रण ठेवता येते. 

प्रतिक्रिया
 
तरुण मुलींमध्ये पीसीओडीचे प्रमाण वाढले आहे. योग्य काळजी घेतल्यास त्यामुळे होणाऱ्या संभाव्य समस्या टाळता येऊ शकतात. यासाठी योग्य आहार आणि व्यायाम करणे गरजेचे आहे. तसेच, पीसीओडीशी निगडित लक्षणे दिसल्यास डॉक्‍टरांचा सल्ला घेणे आवश्‍यक आहे. 

डॉ. निवेदिता पवार, स्त्रीरोगतज्ज्ञ  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com