मुले पळविणाऱ्या टोळीच्या संशयावरून केलेल्या मारहाणीत पाच जण ठार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 जुलै 2018

मुले पळविणाऱ्या टोळीच्या संशयावरून केलेल्या मारहाणीत पाच जण ठार झाल्याची घटना पिंपळनेर (ता. साक्री, जि. धुळे) येथे घडली आहे. मुले पळविणाऱ्या टोळीच्या संशयावरून रहीमपाडा येथे ग्रामस्थांनी केलेल्या मारहाणीत पाचजण ठार झाले आहेत.

धुळे: आदिवासीबहुल साक्री तालुक्‍यातील राईनपाडा (जि. धुळे) येथे मुले पळविणाऱ्या टोळीच्या संशयावरून ग्रामस्थांनी केलेल्या मारहाणीत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. ते सोलापूर जिल्हाकडील आहेत. या घटनेची माहिती घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या पोलिसांवर ग्रामस्थांनी हल्ला केल्यामुळे तणाव निर्माण झाला. पोलिस अधिक्षकांसह फौजफाटा राईनपाड्यात तळ ठोकून आहे.

या घटनेसंदर्भात 'सकाळ'शी बोलताना 'एलसीबी'चे पोलिस निरिक्षक हेमंत पाटील म्हणाले की, ग्रामस्थांनी केलेल्या मारहाणीत पाच जणांचा मृत्यू झाला असून ते सोलापूर जिल्ह्याकडील आहेत. ही घटना नेमकी कुठल्या कारणावरून घडली. यासंदर्भात चौकशी केली जात आहे. पाचही अनोळखी व्यक्ती या एसटीतून राईनपाड्यात दाखल झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. 

राईनपाड्यात घटना
पिंपळनेर पासून (ता.साक्री, जि.धुळे) 25 किलोमीटरवर नवापूर (ता. जि. नंदुरबार) सिमेवर राईनपाडा आहे. तेथे आज आठवडे बाजार होता. त्यावेळी दुपारी 12 च्या सुमारास एसटी बस राईनपाड्यात दाखल झाली. तिच्यातून पाच व्यक्ती उतरल्या. त्या 35 ते 50 वयोगटातील होत्या. त्यांच्या हातात बॅग व पिशव्या होत्या. दुपारी साडेबारानंतर राईनपाड्यात ग्रामस्थांनी केलेल्या मारहाणीत पाच जणांचा मृत्यू झाल्याची बातमी वेगाने पसरली. या दरम्यान पिंपळनेर पोलिसांचे पथकही राईनपाड्याकडे रवाना झाले. ही घटना नेमकी कुठल्या कारणावरून घडली. याविषयी उलटसुलट चर्चा सुरू होती. 

पोलिस पाटलांनी सांगितले की, पाच अनोळखी, संशयीत व्यक्तींपैकी एकाने सहा वर्षाच्या मुलीला बहाणा करून जवळ बोलविले. तो तिला गावातील एका नाल्याच्या दिशेने घेऊन जात असताना ग्रामस्थांनी पाहिले. या संतापातून ग्रामस्थ संशयीतांच्या मागे धावले. त्यात तिघांना झालेल्या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला. अन्य दोघांना मारहाण करत ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाकडे आणले. तिथे दोघांचा मृत्यू झाला. 

ही घटना घडल्यानंतर पिंपळनेरचे पोलिस पथक राईनपाड्यात दखल झाले. त्यांनी या घटनेची माहिती विचारली असता आणि इतके टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी पोलिसांना कळविणे महत्वाचे आहे, असे सांगण्याचा प्रयत्न केला असता निर्माण झालेल्या वादातून संतप्त ग्रामस्थांनी पोलिसांवरही हल्ला केला. या नंतर जिल्हा पोलिस अधीक्षक एम. रामकुमार, 'एलसीबी'चे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील आणि अतिरिक्त फौजफाटा राईनपाड्यात दाखल झाला. ते स्थितीवर नियंत्रण ठेऊन आहेत. पाच संशयितांचे मृतदेह पिंपळनेर ग्रामीण रूग्णालयात नेण्यात येत होते.

Web Title: Five people were killed

टॅग्स