शाळांच्या गुणवत्तावाढीकरिता फाइव्ह स्टार मूल्यांकन पद्धत 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जून 2019

प्राथमिक शाळेतील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांना व वर्गांच्या गुणवत्तेचा आढावा घेण्यासाठी यापुढे फाइव्ह स्टार पद्धतीने मूल्यांकन करण्यात येणार असून, प्रत्येक महिन्यात विद्यार्थ्यांची गुणवत्ता चाचणी घेण्यात येणार आहे.

नाशिक - प्राथमिक शाळेतील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांना व वर्गांच्या गुणवत्तेचा आढावा घेण्यासाठी यापुढे फाइव्ह स्टार पद्धतीने मूल्यांकन करण्यात येणार असून, प्रत्येक महिन्यात विद्यार्थ्यांची गुणवत्ता चाचणी घेण्यात येणार आहे. प्राथमिक शाळांमधील शिक्षकांची वेतनवाढ गुणवत्तेशी जोडण्यात येणार असून, गुणवत्तेची जबाबदारी तालुका व जिल्हास्तरावरील सर्व संबंधित घटकांवर निश्‍चित करणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिली. 

जिल्हा गुणवत्ता कक्षाच्या वतीने शासकीय कन्या शाळेत जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. गुणवत्तावाढीकरिता विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांचेही मूल्यमापन आवश्‍यक असून, त्यासाठी प्रत्येक शाळा व वर्गासाठी फाइव्ह स्टार पद्धत सुरू करण्यात येणार आहे. त्यामध्ये 80 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त गुण असलेल्या शाळा व वर्गासाठी पाच स्टार, 70 ते 80 टक्के दरम्यान गुण असलेल्या शाळांसाठी चार स्टार, 60 ते 70 टक्‍क्‍यांसाठी तीन स्टार, 50 ते 60 टक्के गुण असणाऱ्या शाळांसाठी दोन स्टार व 40 ते 50 टक्‍क्‍यांच्या दरम्यान गुण असलेल्या शाळा व वर्गासाठी एक स्टार, याप्रमाणे मूल्यांकन केले जाणार आहे. त्याचप्रमाणे 40 टक्‍क्‍यांपेक्षा कमी गुण असलेल्या शाळांसाठी एक ब्लॅक स्पॉट, 30 टक्‍क्‍यांपेक्षाही कमी गुण असलेल्या शाळांसाठी दोन ब्लॅक स्पॉट देण्यात येणार आहे. ज्या शिक्षकांना एक किंवा दोन ब्लॅक स्पॉट मिळतील त्यांची वेतनवाढ रोखण्यात येणार असून, यामध्ये सुधारणा करण्यासाठी त्यांना सहा महिने संधी देण्यात येणार असून, अपेक्षित सुधारणा झाल्यास वेतनवाढ पूर्ववत करण्यात येणार आहे. प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर, माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांच्यासह प्रादेशिक, विद्या प्राधिकरण संस्थेचे ज्येष्ठ अधिव्याख्याता, गटशिक्षणाधिकारी, विषयानिहाय तज्ज्ञ शिक्षक उपस्थित होते. 

राज्याच्या स्थितीवर मिळणार अनुदान 
शासनाने ठरवून दिलेल्या इंटिकेटरनुसार राज्य ज्या स्थितीत आहे त्यावर राज्याला अनुदान मिळणार आहे. यामध्ये गुणवत्ता व अध्ययन निष्पत्ती, इयत्तानुरुप प्रवेश, भौतिक सुविधा, समता, प्रशासन प्रक्रिया या पाच प्रमुख विषयांचा समावेश असून, यामध्ये विविध घटकांचा समावेश आहे. प्रत्येक विषयाला गुण ठरवून देण्यात आले आहेत. या गुणांनुसार शाळेची, जिल्ह्याची व राज्याची स्थिती ठरविण्यात येणार आहे. त्यामुळे याकडे विशेष लक्ष देऊन काम करणे आवश्‍यक असल्याचे डॉ. गिते यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five star rating method for schools to increase