परदेशी टोळीवर "मोक्का'साठी प्रस्ताव

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 जुलै 2016

नाशिक - पंचवटीमध्ये भेळविक्रेत्या सुनील वाघ याचा खून व बांधकाम व्यावसायिकाच्या घराबाहेर गोळीबार करून धमकविण्याच्या घटना घडल्यानंतर प्रकाशझोतात आलेल्या कुंदन परदेशीच्या टोळीवर "मोक्का‘अंतर्गत कारवाई करण्यासाठीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. पोलिस आयुक्तालयाकडून लवकरच या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्‍यता आहे. 

नाशिक - पंचवटीमध्ये भेळविक्रेत्या सुनील वाघ याचा खून व बांधकाम व्यावसायिकाच्या घराबाहेर गोळीबार करून धमकविण्याच्या घटना घडल्यानंतर प्रकाशझोतात आलेल्या कुंदन परदेशीच्या टोळीवर "मोक्का‘अंतर्गत कारवाई करण्यासाठीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. पोलिस आयुक्तालयाकडून लवकरच या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्‍यता आहे. 

गेल्या महिन्यात सिडकोतील टिप्पर गॅंगच्या आठ सराईत गुन्हेगारांवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तर, पंचवटीतील परदेशी टोळीवरही मोक्काअंतर्गत कारवाई करण्यासाठीचा प्रस्ताव गुन्हे शाखेने तयार केला आहे. या टोळीचा म्होरक्‍या कुंदन परदेशी याच्यावर यापूर्वीही मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली होती. तर, काही महिन्यांपूर्वीच तो मध्यवर्ती कारागृहातून बाहेर आला होता. त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच त्याने पुन्हा पंचवटी परिसरामध्ये दहशत पसरविण्यास सुरवात केली होती. यादरम्यान त्याने एका महिलेला गावठी कटट्याचा धाक दाखवून धमकावलेही होते. याबाबत पंचवटी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतरही पोलिसांनी परदेशीच्या कारवाईकडे दुर्लक्ष केले होते. क्रांतिनगर येथे भेळविक्री करणाऱ्या वाघ बंधूवर 27 मेस जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात दांडुके व दगडाने मारहाण करीत सुनील वाघ याची हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर संशयित कुंदन परदेशी, अक्षय इंगळे, किरण परदेशी यांच्यासह त्यांचे साथीदार फरारी झाले होते. मात्र, ग्रामीण पोलिसांनी त्याच रात्री विंचूर फाट्यावर दोघांना अटक केली होती. त्यानंतरही वावरत होते; पण पोलिसांना शोध लागत नव्हता. याच गुन्ह्यातील संशयित अक्षय इंगळे याने हनुमानवाडीतील बांधकाम व्यावसायिक अवधूत गायकवाड यांच्या घरासमोर रात्रीच्या सुमारास गोळीबार केल्याने पंचवटी परिसरात आणखीच दहशत पसरली. त्यानंतर पोलिसांनी मुसक्‍या आवळल्याने दोन दिवसांत कुंदन परदेशीसह अक्षय इंगळे व त्यांचे साथीदार पोलिसांना शरण आले. सध्या खून व अवैधरीत्या हत्यार बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल असून, मध्यवर्ती कारागृहात आहेत. 

परदेशीच्या टोळीत 18 संशयित असून, त्यामध्ये दोघे अल्पवयीन आहेत. गुन्हे शाखेने 18 संशयितांविरोधात संघटित गुन्हेगारी कायद्यान्वये (मोक्का) प्रस्ताव तयार केला आहे. तो पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. आयुक्तांकडून या प्रस्तावासंदर्भात मंजुरी मिळताच त्यानुसार या टोळीवर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे त्यांची रवानगी किमान काही वर्षांसाठी तरी मध्यवर्ती कारागृहात राहणार आहे.

Web Title: The foreign thef team "mokka proposal