खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात अपघात; 4 जण ठार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 मार्च 2017

वर्षभरापासून खड्डे बुजवावे अशी वेळोवेळी मागणी केली. त्यामुळे जबाबदार अधिकारी घटनास्थळी आल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही; अशी भूमिका आंदोलकांनी घेतली होती.

धुळे - शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या पाच कंदील परिसरातील घराला लागलेल्या आगीचे प्रकरण ताजे असतानाच मुकटी (ता.धुळे) येथे आज सकाळी साडेआठच्या सुमारास झालेल्या ट्रक आणि सुमोमधील भीषण अपघातात चार जण ठार झाले आहेत. मृतांची संख्या वाढण्याची शक्‍यता आहे. 

सुरतकडून पारोळा जाणारी सुमो आणि जळगावहून धुळ्याकडे येणाऱ्या ट्रकच्या भीषण अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी तासभर रास्ता रोको आंदोलन केले. मुकटी येथे जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेजवळ पुल असून त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. ते वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रक सुमोवर आदळला आणि हि दोन्ही वाहने 50 फुट पुलाच्या खाली कोसळली. सुमोमध्ये मुस्लिम समाजातील 11 जणांचा समावेश होता. ते पारोळ्याला नातेवाईकांकडे जात होते. अपघातानंतर मुक्‍ती ग्रामस्थांनी जखमींना ग्रामीण रूग्णालयात नेले. नंतर पोलिसांसह अन्य यंत्रणा कामाला लागली.

अपघातात फरजाना बानो सिदी (वय २२), सुमय्या इब्राहीम सिदी (वय १२), फरहद इसा सिदी (वय ६) यांचा जागीच मृत्यू झाला. तर, शहाजा बानो सिदी (वय २४) यांची उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

जखमींना जिल्हा शासकिय रूग्णालयात नेण्यात आले. या दरम्यान खड्याच्या मुद्द्यावरून मुक्‍तीच्या संतप्त ग्रामस्थांनी रास्तारोको आंदोलन सुरू केले. यामुळे दुतर्फा वाहतूक खोळंबली होती. वर्षभरापासून खड्डे बुजवावे अशी वेळोवेळी मागणी केली. त्यामुळे जबाबदार अधिकारी घटनास्थळी आल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही; अशी भूमिका आंदोलकांनी घेतली होती. राष्ट्रीय महामार्ग विभागाचे दोन अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पोलिसांसमक्ष आजच खड्डे बुजविण्याचे आश्‍वासन दिले. यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. वेळीच खड्डे बुजविले गेले असते. तर निष्पापांचा बळी गेला नसता अशी संतप्त प्रतिक्रीया युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आंदोलक हर्षल साळुंखे यांनी "सकाळ'शी बोलताना दिली.

Web Title: Four killed in road accident near Dhule