मोबाईलसाठी मित्रानेच केला मित्राचा चाकूने भोसकून खून

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 जुलै 2018

मोबाईल घेतल्याच्‍या क्षुल्लक कारणावरून मित्रानेच मित्राचा चाकूने भोसकून खून केल्याचा धक्कादायक प्रकार मनमाड येथील क्रांतीनगरमध्ये घडला असून, दत्तू सदगीर असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी, एका आरोपीला अटक केली आहे तर तिघांचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी तीन पथके रवाना करण्यात आल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिली आहे.
 

मनमाड - मोबाईल घेतल्याच्‍या क्षुल्लक कारणावरून मित्रानेच मित्राचा चाकूने भोसकून खून केल्याचा धक्कादायक प्रकार मनमाड येथील क्रांतीनगरमध्ये घडला असून, दत्तू सदगीर असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी, एका आरोपीला अटक केली आहे तर तिघांचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी तीन पथके रवाना करण्यात आल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील रेल्वे कारखान्याजवळ असलेल्या क्रांतीनगरमध्ये राहणाऱ्या दत्तू पुंडलिक सदगीर याचे पाप्या उर्फ विनोद मधुकर करोसिया याच्याशी मैत्रीचे संबंध होते. दोघांमध्ये मोबाईल देण्याघेण्यावरून क्षुल्लक बाचाबाची झाली वाद मिटल्यानंतर दोघेही घरी गेले मात्र पाप्याने रात्री साडे आठच्या सुमारास दत्तूच्या घरी जाऊन त्याचा भाऊ निलेश व आई भिमाबाई यांना मारहाण करत जखमी केले याची माहिती मिळताच दत्तू हा पाप्या याच्या घरी गेला व त्याच्या बायकोशी धक्काबुक्की करत शिवीगाळ केली त्यानंतर रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास पाप्याने त्याचे मित्र सोपान उर्फ सोप्या हरिदास हिवराळे (रा. गर्डर शॉप), शेखर देविदास पगारे व रोहित उर्फ स्वप्नील जगताप (दोघे रा. आंबेडकर चौक) या साथीदारांना सोबत घेऊन दत्तुच्या घरी आला आणि त्याने दत्तुला मारहाण करण्यास सुरुवात केली. आपल्या जवळ असलेल्या चाकूने दत्तूला भोसकले दत्तू रक्तबंबाळ होऊन खाली कोसळला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.

भोसकल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला यातील जखमी निलेश यास नाशिक येथे उपचारासाठी पाठविण्यात आले तर दत्तूचा मृतदेह नाशिकच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आला आहे या घेटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, मनमाड विभागाचा अतिरिक्त पदभार असलेले निफाड येथील पोलीस उपअधीक्षक माधव पाडिले व अप्पर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत तपास कामी सुचना केल्या यातील चार पैकी एक आरोपी शेखर देविदास पगारे याला अटक करण्यात आली आहे तर बाकीच्या तीन आरोपीच्या शोधासाठी तीन पथक तयार करण्यात आले असून त्यांना देखील लवकरच अटक करणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

नाशिक येथील फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी येऊन हत्येसाठी वापरण्यात आलेले दोन चाकू तसेच रक्ताचे तसेच इतर नमुणे घेतले आहे पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे मात्र नाशिक येथे शवविच्छेदन झाल्यानंतर जोपर्यंत आरोपीला अटक करत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका मृताच्या नातेवाईकानी घेतली घटनेची माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरली पसरल्याने अफवांचे पीक आले होते. यातील मुख्य आरोपी पाप्या याच्यावर यापूर्वी अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असुन मागील आठवड्यातच तो जामिनावर सुटला असल्याची माहिती मिळाली आहे.

घटनास्थळी एपीआय शेख, पोलीस हवालदार सुनील पवार, वणवे,  कैलास खैरे यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: A friend has murdered his friend