Friendship Day Special : निखळ मैत्रीची अशीही ‘हाफ सेंच्युरी’

सचिन जोशी
रविवार, 4 ऑगस्ट 2019

दोघांनी वयाची साठी ओलांडलेली. दोघेही आपापल्या व्यवसायांत यशस्वी. सामाजिक कार्यातही दोघे अग्रेसर. पण अजूनही मैत्रीच सबकुछ मानणारे अनिलभाई आणि दिलीपशेठ यांच्यातील हे निखळ नाते ‘हाफ सेंच्युरी’ साजरे करतेय. केवळ मित्र म्हणूनच सोबत राहणे नव्हे; तर एकमेकांच्या भावना न बोलताही जाणून घेता येत असतील तर त्याला खऱ्या अर्थाने निखळ मैत्री म्हणता येईल.

जळगाव - दोघांनी वयाची साठी ओलांडलेली. दोघेही आपापल्या व्यवसायांत यशस्वी. सामाजिक कार्यातही दोघे अग्रेसर. पण अजूनही मैत्रीच सबकुछ मानणारे अनिलभाई आणि दिलीपशेठ यांच्यातील हे निखळ नाते ‘हाफ सेंच्युरी’ साजरे करतेय. केवळ मित्र म्हणूनच सोबत राहणे नव्हे; तर एकमेकांच्या भावना न बोलताही जाणून घेता येत असतील तर त्याला खऱ्या अर्थाने निखळ मैत्री म्हणता येईल. शहरातील प्रथितयश व्यावसायिक अनिल कांकरिया व दिलीप गांधी यांच्यातील नातेही असेच निर्मळ आहे. दोघेही आज साठी पार केलेले; पण त्यांची ही ‘यारी’देखील पन्नाशीकड़े जाणारी.

दोघांचे शालेय शिक्षण ला. ना. विद्यालयात झाले. आठवीत असताना एस. ए. कुळकर्णी सरांकडे इंग्रजीचा क्‍लास लावला तेव्हा झालेली मैत्री आजही टिकून आहे. नुसती टिकून नाही तर मैत्रीपलीकडचे नाते दोघांत निर्माण झाले आहे.

वाटचालीतील सहप्रवासी
त्यावेळी शाळेत असो की क्‍लासला दोघेही सोबत जाणार. अगदी मू. जे. महाविद्यालयातही प्रवेश घेतला तोही सोबत. एकाच (कॉमर्स) शाखेला. पालकांच्या आग्रहास्तव औरंगाबादला सायन्सलाही दोघे सोबत वर्षभर होते. पण तेथे मन रमले नाही म्हणून पुन्हा कॉमर्स घेतले. पदवी प्राप्त करून पुढे सोबतच लॉ कॉलेजला प्रवेश घेतला. वर्षभर कॉलेज केले; नंतर दोघेही व्यवसायात रमले ते आजपर्यंत.

कुटुंबही झाले मित्र
कालांतराने दोघांचे लग्न झाले. कांकरिया आणि गांधी या परिवारांत मग पहिले कन्यारत्नच आले. नंतर दोघांना मुलगा झाला. दोघांची मुले सीए झाली. हा घटनाक्रम केवळ योगायोग म्हणावा की अनिलभाई आणि दिलीपशेठमधील प्रेम. पण आज त्यांच्या या मैत्रीच्या निमित्ताने दोघांच्या कुटुंबातील सदस्यही मैत्रीच्या या अतूट धाग्यात आपसूकच विणली गेली.
आजही दोघांना या नात्याबद्दल विचारले तर ते भरभरून बोलतात.

लहानपणापासूनच एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होणे, हा औपचारिकतेचा भाग होईल. पण त्यापलीकडे जाऊन एकमेकांच्या भावना समजून घेत, परस्परांच्या आवडी-निवडी जपत, कुटुंबीयांची काळजी घेत सुरू असलेल्या या अतूट मैत्रीची अविरत वाटचाल अशीच अखंडित सुरू राहील; नव्हे तर त्यातील दृढ़विश्वास मैत्रीच्या निखळ नात्याचा आदर्श ठरेल, यात शंका नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Friendship Day Special Anilbhai and Dilipsheth