नाशिक जिल्हा बॅंकेला निधी द्या  - मुख्यमंत्री 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 मे 2017

नाशिक - रोकड टंचाईमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची चलनकोंडी फुटली आहे. राज्य सहकारी बॅंकेने जिल्हा बॅंकेस मदत करावी, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. त्यामुळे जिल्हा बॅंकेला मागील वर्षी केलेल्या कर्ज पुनर्गठनाचा निधी तसेच राज्य बॅंकेकडील ठेवींच्या पोटीचा ओव्हरड्राफ्ट मिळण्याची चिन्हे आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर राज्य बॅंक जिल्हा बॅंकेला किती तत्परतेने मदत करते, याकडे लक्ष आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन व सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत आज नाशिक जिल्हा बॅंकेच्या आर्थिक संकटावर तोडगा काढण्यासाठी बैठक झाली. अध्यक्ष नरेंद्र दराडे यांनी जिल्हा बॅंकेवरील आर्थिक संकट व त्यांची कारणे याबाबत सविस्तर माहिती दिली. राज्य सहकारी बॅंकेला मागील वर्षीचा कर्ज पुनर्गठनचा निधी अद्याप मिळाला नसल्याने तो देऊन आर्थिक मदतीचे साकडे घातले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबत राज्य सहकारी बॅंकेचे प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष सुखदेवे यांच्याशी चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी श्री. सुखदेवे यांना कर्ज पुनर्गठनाचा रखडलेला निधी द्यावा तसेच ठेवींवर ओव्हरड्राफ्ट देण्याच्या सूचना केल्या. 

नाशिक जिल्हा बॅंकेला वाचविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांचे, नियोजन आराखडा तयार करण्याचेही आदेश दिले. रखडलेली कर्जवसुली लक्षात घेता, नाबार्डच्या नियमानुसार जिल्हा बॅंकेला पुनर्गठनाची रक्कम देण्यास अडचण येत असल्याचे सुखदेवे यांनी सांगितले. त्यावर, यातून योग्य तो मार्ग काढून बॅंक वाचविण्यासाठी तत्काळ मदत करण्यासाठीचे नियोजन करण्याच्या सूचना सहकारमंत्री देशमुख यांनीदेखील दिल्या. शेतकऱ्यांची बॅंक वाचविण्यासाठी सर्व मदत केली जाईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी सांगितले. बैठकीस आमदार बाळासाहेब सानप, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, अध्यक्ष नरेंद्र दराडे, संचालक शिरीषकुमार कोतवाल, परवेझ कोकणी, गणपत पाटील, राज्य बॅंकेचे अधिकारी आदी उपस्थित होते. 

जिल्हा बॅंकेकडे पडून असलेल्या जुन्या चलनातील हजार व पाचशे रुपयांच्या नोटांमुळे बॅंका संकटात आल्याचे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या निदर्शनास आणून दिले जाणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. त्यामुळे या नोटांबाबत लवकर निर्णय घेण्याची विनंती केंद्र सरकारला करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

Web Title: Fund to Nashik District Bank - Chief Minister