विद्यार्थ्यांना शालेय स्तरापासून कृषिशिक्षण आवश्‍यक 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 मार्च 2017

जळगाव - शिक्षण पूर्ण करून विद्यार्थी दशेतच शेतकरी धर्म ज्याने स्वीकारला त्यानेच मातीशी खरा इमान राखला असे म्हणता येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच कृषिशिक्षण दिले पाहिजे, असे मत व्यक्त करत अभियांत्रिकीच्या महाविद्यालयात असताना कृषी विषयावर आधारित परिषद घेणे ही कौतुकाची बाब आहे, या शब्दात कृषिभूषण विश्‍वासराव पाटील यांनी रायसोनी महाविद्यालयाचा गौरव केला. 

जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात "विकसित तंत्रज्ञानाचा भारतीय शेतकऱ्यांना होणारा फायदा' या विषयावर शुक्रवारी आयोजित राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. यावेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे प्राचार्य डॉ. तुलसीदास बास्टेवाड, पंजाबराव कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. महेंद्र नागदिवे, कृषी अधिकारी डॉ.अनिल भोकरे, कार्यकारी संचालक प्रीतम रायसोनी, प्राचार्य डॉ. प्रभाकर भट व परिषदेचे समन्वयक प्रा. किशोर भदाणे आदी. मान्यवर उपस्थित होते. यावेळी संशोधकांनी सादर केलेल्या शोधनिबंधांची पुस्तिका मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली. 

यावेळी मार्गदर्शन करताना विश्‍वासराव पाटील म्हणाले, भारतात आजही 60 टक्के शेती निसर्गावर अवलंबून आहे. त्यामुळे निसर्गाची काळजी घेणे आपले कर्तव्य आहे. शेतीला आवश्‍यक तेवढेच पाणी द्यावे. याठिकाणी येताना विद्यार्थ्यांनी तयार केलेले दुष्काळ आणि हिरवळ असे दोन प्रतिमान दिसले. परंतु आपण जलसंधारण आणि मृगसंधारण समजून घ्या, तेव्हाच आपण दुष्काळमुक्त होऊ. आज तरुणाई नोकरीच्या शोधात फिरते परंतु, शेती करण्याची मानसिकता नाही, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. 

प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. भट यांनी संशोधक, शेतीचे उपकरणे निर्माण करणारे उद्योजक व शेतकरी यांचा समन्वय साधून शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्याचा छोटासा प्रयत्न या परिषदेच्या माध्यमातून करण्यात येत असल्याचे सांगितले. परिषदेत भू व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, ऊर्जेचे नूतनीकरण, कृषी उप्तादनासाठी नवीन जाहिरातीच्या कल्पना, माहिती तंत्रज्ञानाचे उपयोजन अशा विविध विषयांवर शोधनिबंध सादर झाले. शेतकरी आत्महत्येची व्यथा सांगणारी कविताही प्रा. राहुल त्रिवेदी यांनी सादर केली. प्रा. मीनल निकोसे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. मयूरी गचके यांनी आभार मानले. 

Web Title: G. H. Rayasoni College of Engineering