व्यापारी संकुलांतील गाळ्यांचे फेरमूल्यांकन करा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 जुलै 2019

व्यापारी संकुलांतील गाळ्यांचे फेरमूल्यांकन करा 

व्यापारी संकुलांतील गाळ्यांचे फेरमूल्यांकन करा 

जळगावः महापालिका मालकीच्या मुदत संपलेल्या व्यापारी संकुलांतील गाळ्यांवर करण्यात आलेल्या भाड्याची आकारणी ही अयोग्य पद्धतीने केली असून, ती अन्यायकारक आहे. त्यामुळे या गाळ्यांचे फेरमूल्यांकन करावे, अशी मागणी फुले मार्केटमधील पहिल्या मजल्यावरील गाळेधारकांनी उपमहापौर डॉ. अश्‍विन सोनवणे यांच्याकडे केली. तसेच याबाबत पालकमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन चर्चा करण्याचा निर्णय चर्चेअंती घेण्यात आला. 
महापालिका मालकीच्या 20 व्यापारी संकुलांतील गाळेधारकांच्या भाडे कराराची मुदत संपलेली असून, त्यांच्याकडे गेल्या आठ वर्षांपासून गाळ्यांचे भाडे थकले आहे. आज फुले मार्केटमधील पहिल्या मजल्यावरील 126 गाळेधारकांचे शिष्टमंडळ महापौर सीमा भोळे यांना भेटण्याठी महापालिकेत गेले होते. परंतु महापौर तेथे नसल्याने गाळेधारकांनी उपमहापौर डॉ. सोनवणे, गटनेते भगत बालाणी व नगरसेवक कैलास सोनवणे यांच्याशी चर्चा केली. 

गाळ्यांच्या स्थितीनुसार भाडे आकारणी व्हावी 
उपमहापौर डॉ. सोनवणेंकडे भूमिका मांडताना गाळेधारक म्हणाले, की महापालिकेने गाळ्यांची केलेली भाडे आकारणी पूर्णपणे चुकीची आहे. त्यांनी सर्व गाळ्यांची समसमान भाडे आकारणी केली आहे. मात्र, तसे न करता गाळ्यांची स्थिती पाहून ती आकारणी करणे आवश्‍यक आहे. 

फेरमूल्यांकन करून भाडे आकारा 
व्यापारी संकुलांतील व्यापाऱ्यांचे गाळे पहिल्या मजल्यावर असून, त्या ठिकाणची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. या ठिकाणी व्यवसायही चालत नसून, अडचणीच्या ठिकाणी आमचे गाळे आहेत. तरीही महापालिकेकडून त्यांची भाडे आकारणी सारखीच असल्याने ही बाब अन्यायकारक असल्याचे गाळेधारकांनी सांगितले. त्यामुळे भाडे आकारणी करताना एका गाळ्याचे दोन गाळे धरले गेले असून, त्यातून घसारा रक्कम वजा केलेली नाही. त्यामुळे या प्रकारच्या दुरुस्त्या करून गाळ्यांचे फेरमूल्यांकन करावे व त्यानुसर भाडे आकारणी केली जावी, अशी मागणी गाळेधारकांनी बैठकीत केली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: galyache fermulyakan kara