कचरा संकलनाच्या मार्गात सतराशे विघ्ने

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

दोन वर्षांपासून निविदा प्रक्रियाच सुरू; समस्या मात्र कायम

धुळे - तब्बल दोन वर्षे लोटल्यानंतरही शहरातील कचरा संकलनाचा ठेका देण्याची प्रक्रिया महापालिका पूर्ण करू शकलेली नाही. निविदा मागविल्या गेल्या. मात्र, कधी निविदाच आल्या नाहीत, कधी त्यात त्रुटी काढल्या गेल्या, तर आता निविदा प्राप्त होऊनही प्रश्‍न मार्गी लागत नसल्याने नेमके घोडे कुठे अडले, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. बचत गटांच्या माध्यमातून कचरा संकलन सुरू असले, तरी समस्या कायम आहेत.

दोन वर्षांपासून निविदा प्रक्रियाच सुरू; समस्या मात्र कायम

धुळे - तब्बल दोन वर्षे लोटल्यानंतरही शहरातील कचरा संकलनाचा ठेका देण्याची प्रक्रिया महापालिका पूर्ण करू शकलेली नाही. निविदा मागविल्या गेल्या. मात्र, कधी निविदाच आल्या नाहीत, कधी त्यात त्रुटी काढल्या गेल्या, तर आता निविदा प्राप्त होऊनही प्रश्‍न मार्गी लागत नसल्याने नेमके घोडे कुठे अडले, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. बचत गटांच्या माध्यमातून कचरा संकलन सुरू असले, तरी समस्या कायम आहेत.

शहरातील कचरा संकलनाचे काम २०१३ मध्ये समीक्षा कन्स्ट्रक्‍शन कंपनीला देण्यात आले होते. ३१ डिसेंबर २०१४ ला कंपनीच्या ठेक्‍याची मुदत संपली. त्यानंतरही पर्यायी व्यवस्था नसल्याने तीच कंपनी पुढे हे काम करत राहिली. १ डिसेंबर २०१४ पासून बचत गटांना कचरा संकलनाचे काम देण्यात आले. ते आजपर्यंत कायम आहे.

दोन वर्षे निविदा प्रक्रिया
कचरा संकलनाचा ठेका देण्यासाठी महापालिका गेल्या दोन वर्षापासून निविदा प्रक्रिया राबत आहे. दरम्यानच्या काळात समीक्षा कन्स्ट्रक्‍शन कंपनीला ब्लॅकलिस्टमध्ये टाकल्याने कंपनी न्यायालयात गेली होती. त्यामुळे निविदा प्रक्रियेला स्थगिती मिळाली होती. स्थगिती उठल्यानंतर निविदा प्रक्रिया पुन्हा सुरू झाली. शहराच्या चार भागांसाठी चार ठेकेदार नेमण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे, त्यादृष्टीने ही प्रक्रिया राबवली गेली. यात पहिल्यावेळी एकाच कंपनीने चार वेगवेगळ्या नावाने निविदा भरल्या, दुसऱ्यांदा निविदांमध्ये त्रुटी काढल्या गेल्या, निकष बदलले गेले. आता तिसऱ्यांदा निविदा काढल्यानंतर निविदा प्राप्तही झाल्या मात्र तरीही घोडे अडलेलेच आहे.

घोडे अडले की अडवले?
कचरा संकलनाच्या निविदा प्राप्त झाल्यानंतर प्रशासनस्तरावर संबंधित एका अधिकाऱ्याकडून दुसऱ्या अधिकाऱ्याकडे फायली फिरल्या, सर्व प्रक्रिया पूर्ण होऊनही मात्र नेमके घोडे कुठे अडले हा प्रश्‍न कायम आहे. या प्रक्रियेत पुन्हा काही त्रुटी आहेत की आणखी काही वेगळी कारणे आहेत हे मात्र समजायला मार्ग नाही.

समस्या मात्र कायम
बचतगटांना कचरा संकलनाचे काम दिले असले तरी शहराची गरज लक्षात घेता बचत गटांची ही यंत्रणा तोकडी पडत असल्याचे दिसून येते. आजही अनेक भागात घंटागाड्या दररोज, नियमित जात नाहीत. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी कायम आहेत.

बचत गटातल्या महिला कुठे?
कचरा संकलनाचे काम महिला बचत गटांच्या माध्यमातून होत असले तरी या संपूर्ण प्रक्रियेत बचत गटांच्या महिला कुठेही दिसून येत नाहीत. किमान आपली बिले काढायला तरी महिला महापालिकेत दिसाव्यात मात्र तसेही दिसत नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेबाबत उलट-सुलट चर्चा महापालिकेत सुरू असते. स्वच्छता अभियान, स्वच्छ सर्वेक्षणात चांगली कामगिरी करण्यासाठी धडपडणाऱ्या महापालिकेने कचरा संकलनाचा हा प्रश्‍न तातडीने सोडवावा अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

Web Title: garbage collection problem