गौतमी, कश्‍यपीतून गंगापूरला पाणी येऊ द्यावे

गौतमी, कश्‍यपीतून गंगापूरला पाणी येऊ द्यावे

नाशिक - गौतमी-गोदावरी व कश्‍यपी धरण परिसरात पावसाची संततधार कायम असल्याने पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे दोन्ही धरणांचे दरवाजे बंद न करता गंगापूर धरणात पाणी येऊ द्यावे, अशी मागणी महापालिकेने पाटबंधारे विभागाकडे केली आहे. महापालिकेची मागणी मान्य झाल्यास गंगापूर धरणाच्या साठ्यात झपाट्याने वाढ होऊन शहरावरचे पाणी संकट टळण्यास मदत होईल.

गंगापूर धरणाच्या वरच्या बाजूला कश्‍यपी व गौतमी गोदावरी धरणे आहेत. कमी क्षमता असली तरी गंगापूर धरणात पाणी साठविण्यासाठी दोन्ही धरणांचा चांगला उपयोग होतो. पावसाळा सुरू झाल्यानंतर दोन्ही धरणांचे दरवाजे बंद केले जातात. अतिरिक्त पाणी साचल्यानंतर गंगापूर धरणात पाणी सोडले जाते. यंदा पाण्याची बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. धरणाच्या पाण्याची पातळी सहाशे मीटरपर्यंत घसरली आहे. 598 मीटरपर्यंत पाणी आल्यास तेथून खाली गाळातून पाणी उपसावे लागते. महापालिकेने तशी तयारी केली आहे. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चाची तरतूद केली आहे. तो खर्च वाचविण्यासाठी गौतमी व कश्‍यपी धरणांचे दरवाजे बंद न करता गंगापूर धरणात पाणी येऊ द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

... तर दारणातून पाणी उचलणार
इगतपुरी तालुक्‍यात दमदार पाऊस झाल्याने दारणा धरणात अकराशे दशलक्ष घनफूट पाणी साचले आहे. महापालिकेचे दारणा धरणात 131 दशलक्ष घनफूट आरक्षण शिल्लक आहे. यापूर्वीच पाणी संपल्याने गंगापूर धरणातून पाणी उचलण्याचा पर्याय महापालिकेकडे होता; परंतु त्यासाठी जलसंपदा विभागाची परवानगी आवश्‍यक होती. आता दारणा परिसरात चांगला पाऊस झाल्याने तेथून पाणी सोडल्यास चेहेडी येथील दारणा धरणातून पाणी उचलण्याचा एक पर्याय महापालिकेकडे उपलब्ध झाला आहे. त्यामुळे पावसाने दडी दिल्यास काही प्रमाणात या भागातून पाणी उचलणे शक्‍य होईल.

कपातीची टांगती तलवार कायम
धरण परिसरात चांगला पाऊस झाला असला तरी धरणसाठ्यात अल्पशी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत सुमारे 40 दशलक्ष घनफूट पाणी गंगापूर धरणात साचले आहे. पावसाची संततधार आठ दिवस कायम राहण्याची शाश्‍वती नाही. त्यामुळे पाण्याच्या फेरनियोजनावर महापालिका प्रशासन ठाम आहे. त्यामुळे आठवड्यातून दोन दिवस पाणीकपातीची टांगती तलवार नाशिककरांवर कायम राहील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com