‘गिरणे’ची खळखळ झाली बंद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 मार्च 2017

सिंचनासाठीची तीन आवर्तने पूर्ण; महिन्यानंतर पिण्यासाठी मिळणे शक्‍य

पिलखोड (ता. चाळीसगाव) - सतत तीन महिन्यांपासून खळखळ वाहणाऱ्या गिरणा नदीचे सिंचनासाठीचे तिसरे आवर्तन काल (१२ मार्च) पूर्ण झाले. त्यामुळे गिरणा नदीची खळखळ बंद झाली आहे. यानंतर मागणी झाली तरच गिरणा धरणातून आवर्तन सोडण्यात येणार आहे. 

सिंचनासाठीची तीन आवर्तने पूर्ण; महिन्यानंतर पिण्यासाठी मिळणे शक्‍य

पिलखोड (ता. चाळीसगाव) - सतत तीन महिन्यांपासून खळखळ वाहणाऱ्या गिरणा नदीचे सिंचनासाठीचे तिसरे आवर्तन काल (१२ मार्च) पूर्ण झाले. त्यामुळे गिरणा नदीची खळखळ बंद झाली आहे. यानंतर मागणी झाली तरच गिरणा धरणातून आवर्तन सोडण्यात येणार आहे. 

२००८ मध्ये गिरणा धरण ९३ टक्के भरले होते. मागील वर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे आठ वर्षांनी धरण ९० टक्के भरले. त्यामुळेच सिंचनासाठीची तीन आवर्तने देणे शक्‍य झाले. डिसेंबरपासून मार्चच्या मध्यापर्यंत गिरणा धरणाची सिंचनासाठीची तीन आवर्तने लागोपाठ सोडली. शेवटचे आवर्तन काल (१२ मार्च) पूर्ण झाले. 

शेतीसाठी झाला लाभ 
ठरल्याप्रमाणे गिरणा धरणातून आवर्तने मिळाल्याने शेतीसाठी हे पाणी संजीवनी ठरले आहे. यामुळे गिरणाकाठ हिरवाईने नटला आहे. या आवर्तनामुळे सिंचनाचा व पिण्याचा पाण्याचा असे दोन्ही प्रश्न सुटले आहेत. नदीसोबतच पांझण डावा, जामदा उजवा, जामदा डावा व दहिगाव कालवा अशा चार कालव्यांद्वारे शेतकऱ्यांना पाणी देता आल्याने शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाचे आभार व्यक्त केले आहेत. जामदा उजवा, डावा व दहिगाव कालवा यांची तीन आवर्तने पूर्ण झाली असून, पांझण डावा कालव्याचे तिसरे आवर्तन सुरू आहे. ते देखील येत्या काही दिवसांनी पूर्ण होणार आहेत. गहू, मका आणि कांदा पिकांना ही आवर्तने फायद्याची ठरली आहेत. परिणामी यंदा उत्पादनात वाढ होणार असल्याचे चित्र गिरणा पट्ट्यात दिसत आहे. 

गिरणात ३७ टक्के साठा 
सध्या गिरणात ३७ टक्के म्हणजेच ९ हजार ५०० दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. त्यात मृतसाठा ३ हजार दशलक्ष घनफूट एवढा आहे. म्हणजे साडेसहा हजार दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. मागील वर्षी मृत पाणीसाठ्याने जिल्ह्याची तहान भागवली होती. त्या तुलनेने हे चालू व पुढच्या वर्षासाठी पिण्याच्या पाण्याचे पुरेसे आवर्तन मिळू शकेल एवढा साठा शिल्लक आहे. यंदा सिंचनासाठी तीन आवर्तने देऊनही धरणात मुबलक पाणी असल्याचे सहायक अभियंता हेमंत पाटील यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

मागणी झाल्यास आवर्तन 
तीन महिने खळखळून वाहिलेल्या गिरणा नदीमुळे आता एक महिना तरी पाण्याची समस्या उद्‌भवू शकणार नाही. त्यामुळे एप्रिलअखेर पिण्याचे आवर्तन मिळण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, मागणी झाल्यास पिण्यासाठी आवर्तन दिले जाईल, असे गिरणा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

यंदा पिण्याच्या पाण्याची कमतरता नाही. पुढील वर्षी पाऊस उशिरा झाला तरीही पिण्याच्या पाण्यासाठी कुठलीही अडचण भासणार नाही एवढा साठा गिरणा धरणात शिल्लक आहे. 
- हेमंत पाटील, सहाय्यक अभियंता, गिरणा धरण

Web Title: girana river water