नऊ दुर्गांनी स्मशानात खोदला सीसीटी चर

कमलेश पटेल
बुधवार, 16 मे 2018

बामखेडा (ता. शहादा) - मृत माणसावर अंत्यसंस्कारानंतर स्मशानातून लोक काढता पाय घेतात. तेथे जायला कोणी धजावत नाही. परंतु भोंगरा (ता. शहादा ) येथील नऊ मुलींनी चक्क स्मशानातच सीसीटी चर खणणे सुरू केले. गावकऱ्यांनी श्रमदान करायला आणि त्यांच्या शिवारात काम करायला नकार दिला. परंतु या नऊ दुर्गांना मनातील दुष्काळाची झळ व काम करण्याची जिद्द स्वस्थ बसू देत नव्हती. यासाठी गावकऱ्यांचा विरोध झुगारून या मुलींनी जलसंधारणाच्या कामासाठी गावकुसाबाहेरील स्मशानभूमीची जागा निवडली.

भोंगारा गावात पाणी फाउंडेशनतर्फे मनोज चव्हाण पाणी व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेऊन गावात दाखल झाला. पाणी जिरविण्यासाठी नाल्याच्या आजूबाजूची योग्य गायरान जमीन हवी होती. नाल्याच्या आजूबाजूची गायरान जमीन ही नेमकी गावाच्या स्मशानभूमी जागा असल्याने तो चिंतेच पडला. मात्र गावातील नऊ मुलींनी मनात असलेल्या परंपरागत भिंतींना मूठमाती देऊन मनोजच्या पंखांना बळ देत स्मशानात काम सुरू केले. तेथून दगड आणून बांध बांधायला सुरवात केली. उपस्थितांनी विचारल्यावर मृतदेहाला दगडाचे काय काम असते बरे? असा प्रतिप्रश्‍न करीत सगळ्यांनाच या मुलींनी निरुत्तर केले. पाण्याच्या निर्मळतेत समाजातील सर्व चुकीच्या गोष्टी धुवून काढण्याची क्षमता आहे, असे उपस्थितांना बोलून दाखविल्यावर सर्वांनीच कौतुकाने पाठ थोपटली. विशेष म्हणजे या नवदुर्गा पाचवी ते नववी वर्गापर्यंतच्या आहेत.

"अंनिस'तर्फे कौतुक
भोंगरा गावातील मुलींच्या व मनोजच्या धाडसाचे कौतुक करत शहादा येथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी स्वतः गावात जाऊन या मुलांसमवेत श्रमदान केले. अशाच नवदुर्गा गावोगावी झाल्यास दुष्काळ हद्दपार व्हायला वेळ लागणार नाही, असेही गौरवोद्‌गार त्यांनी काढले.

Web Title: girl crematorium Water conservation work