सावत्र आईच्या जाचातून मुक्तता करत मुलगी सख्ख्या आईच्या कुशीत

अंबादास देवरे
रविवार, 25 मार्च 2018

सावत्र आईकडून होत असलेल्या अत्याचारास कंटाळून पूनम पवार या बालिकेने आपली सुटका करुन घेत जन्मदात्या आईकडे जाण्याचा मार्ग शोधला.

सटाणा - सावत्र आईकडून दररोज होत असलेल्या अत्याचारास कंटाळून येथील पूनम राजेंद्र पवार (वय 10) या बालिकेने मोठ्या हिंम्मतीने रस्त्यावर उभ्या असलेल्या एका सुजाण महिलेच्या सहाय्याने आपली सुटका करुन घेत जन्मदात्या आईकडे जाण्याचा मार्ग शोधला. या सर्व प्रकारात महत्वाची भूमिका बजावली ती सटाण्याचे पोलिस निरीक्षक हिरालाल पाटील, सामाजिक कार्यकर्ते तथा महिला बालविकास विभाग वन स्टोप सेंटर समितीचे जिल्हा सदस्य शाम बगडाणे व नारी सहाय्यता केंद्राच्या अॅड. सरोज चंद्रात्रे यांनी.

याबाबतचे वृत्त असे की, येथील बांधकाम मजुरी करणारे राजेंद्र पवार यांनी पहिल्या पत्नीला फारकत देऊन दुसरा विवाह केला आहे. फारकतीनंतर पवार यांच्या पहिल्या पत्नीची मुलगी पूनम ही वडिलांकडेच वास्तव्यास आहे. मात्र सावत्र आईकडून नेहमी बेदम मारहाण व अत्याचार होत असल्याने पूनम आज घरातून पळून आली. याचवेळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ चार फाटा परिसरात उभ्या असलेल्या एका महिलेला तिने रडत - रडत आपली दुर्देवी कहाणी सांगत सावत्र आईच्या जाचातून मला मुक्त करावे आणि मालेगाव येथे माझ्या जन्मदात्या आईकडे पोहोचविण्याची विनंती केली. त्या महिलेनेही या प्रकाराकडे गांभीर्याने पाहत सटाणा पोलिस ठाण्यात मोबाईलवरुन संपर्क साधला व घटना पोलिसांना सांगितली.

सटाणा पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हिरालाल पाटील यांनी सहकारी पोलिसांच्या सहाय्याने पूनमला पोलिस ठाण्यात आणले. श्री. पाटील, ठाणे अंमलदार नवनाथ पवार व हवालदार कैलास खैरनार यांनी तिला खाऊ देऊन तिची आस्थेवाईकपणे चौकशी करीत सत्य उलगडून घेतले. त्यानुसार पोलिसांनी पुढील वाटचाल सुरु केली. पोलिस निरीक्षक पाटील यांनी येथील नारी सहाय्यता केंद्राच्या प्रमुख अॅड. सरोज चंद्रात्रे व सामाजिक कार्यकर्ते तथा महिला बालविकास विभाग वन स्टोप सेंटर समितीचे जिल्हा सदस्य शाम बगडाणे यांना तात्काळ पोलिस ठाण्यात बोलावून घेतले व घडल्या प्रकारची माहिती दिली. यावेळी श्री. पाटील यांनी पूनमला घरचा पत्ता विचारला असता तिला रडू कोसळले. मला फक्त माझ्या आईकडे सोडा असे ती विनवू लागली. तिच्या या एकूणच गयावया केल्याने पोलिसांनाही गलबलून आले. अखेर तिला विश्वासात घेवून शहरातील मंगलनगरमधील राजेंद्र पवार या तिच्या वडिलांचे घर दुरुन दाखविण्यास ती तयार झाली. त्याप्रमाणे सटाणा पोलिसांनी पूनमला गाडीत बसवून मंगलनगरमध्ये नेले व घर बघितले. त्यानंतर पोलिसांनी राजेंद्र पवार व तिच्या सावत्र आईला घेवून पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी या अन्यायाबाबत विचारणा केली असता राजेंद्र पवार सौ.पवार यांनी आम्ही त्रास देत नसल्याचा पवित्रा घेतला. मात्र पूनमने मला येथे राहायचे नाही, मला माझ्या आईकडे मालेगाव येथे पोहोचवा अशी विनंती सुरूच ठेवली. अखेर पोलिसांनी मालेगाव येथे छावणी पोलिस ठाण्यात संपर्क साधला आणि पूनमच्या जन्मदात्या आईला सटाणा येथे बोलावून घेतले. सटाणा पोलिस ठाण्यात आईला बघताच पूनमणे आईकडे धाव घेत तिला मिठी मारली. आईने देखील आपल्या लेकीला प्रेमाने जवळ घेतले. यावेळी दोघा मायलेकींना रडू कोसळले. सटाणा पोलिसांनी सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून पूनमला तिच्या आईच्या ताब्यात सुपूर्द केले.

Web Title: A girl searched her real mother in satana