ध्येयवेड्या तरुणामुळे बेहेडच्या शाळेत ‘ई-लर्निंग’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 ऑगस्ट 2016

कासारे - प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यश मिळवून उच्च पदावर पोहोचलेले अनेक जण असतात. मात्र, गावासाठी, मातृभूमीसाठी काही तरी करण्याची जिद्द बाळगणारे व त्यासाठी सक्रिय योगदान देणारे हाताच्या बोटावर मोजता येतील अशी व्यक्तिमत्त्वे विरळच. अशाच एका तरुणाने गावातील शाळा डिजिटल करून विद्यार्थ्यांना ‘ई-लर्निंग’चे शिक्षण उपलब्ध करून देण्यासह गावाच्या विकासाचा विडा उचलला आणि त्याचे हे स्वप्न उद्या (ता. १२) साकार होत आहे. 

 

कासारे - प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यश मिळवून उच्च पदावर पोहोचलेले अनेक जण असतात. मात्र, गावासाठी, मातृभूमीसाठी काही तरी करण्याची जिद्द बाळगणारे व त्यासाठी सक्रिय योगदान देणारे हाताच्या बोटावर मोजता येतील अशी व्यक्तिमत्त्वे विरळच. अशाच एका तरुणाने गावातील शाळा डिजिटल करून विद्यार्थ्यांना ‘ई-लर्निंग’चे शिक्षण उपलब्ध करून देण्यासह गावाच्या विकासाचा विडा उचलला आणि त्याचे हे स्वप्न उद्या (ता. १२) साकार होत आहे. 

 

बेहेड (ता. साक्री) येथील युवराज संभाजी तोरवणे असे या ध्येयवेड्याचे नाव आहे. सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या युवराजचे बेहेड येथीलच न्यू इंग्लिश स्कूलमध्ये बारावीपर्यंत शिक्षण झाले. युवराजची शिक्षणाची भूक मोठी होती. आर्थिक स्थिती साधारण असतानाही त्याने त्यावर मात करत २००१ मध्ये बडोदा गाठले आणि तेथून फायर सेफ्टी इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केला. यानंतर एका कंपनीत नोकरी करत असताना २००६ मध्ये त्याने महाराष्ट्र स्टेट टेक्‍निकल बोर्डचा इंजिनिअरिंगचा (एमएसबीटीई) अभ्यासक्रम पूर्ण केला. २०१५ मध्ये त्याने इंग्लंडच्या ब्रिटिश सेफ्टी कांफिल्डचे शिक्षण घेतले. यानंतर युवराज मूळच्या जपानच्या मित्सुबिशी या जागतिक कंपनीच्या ‘मित्सुबिशी एलिवेटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’च्या मुंबई शाखेत सेफ्टी मॅनेजर म्हणून रुजू झाला.

 

युवराजने ग्रामीण भागातील विद्यार्थांना शिक्षण पूर्ण करताना कोणकोणत्या कठीण परिस्थितीतून जावे लागते, याविषयी कंपनीला एक अहवाल दिला व मदतीचे आवाहन केले. तब्बल दोन वर्षे त्याने कंपनीकडे पाठपुरावा सुरू ठेवला. कंपनीचे पश्‍चिम भारताचे मुख्याधिकारी सुरेश के. यांनी ही समस्या जाणून घेतली. सामाजिक बांधिलकीची कास धरणाऱ्या श्री. सुरेश के. यांनी कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्‍टर इबाओ ओडा सॅन यांच्यापर्यंत ती माहिती पोहोचवली. युवराजनेही श्री. सॅन यांना विषय पटवून दिला. श्री. सॅन यांनी युवराजची तळमळ पाहून कंपनीच्या ‘सीएसआर’ फंडातून निधी देण्यास मंजुरी दिली. 

या निधीतून बेहेडच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये ई-लर्निंगची सुविधा उपलब्ध होत आहे. उद्या सकाळी अकराला ‘सशक्त ग्रामीण भारत’ उपक्रमांतर्गत श्री. सॅन यांच्यासह दहा वरिष्ठ अधिकारी या शाळेला भेट देत असून, त्यांच्या उपस्थितीत ई-लर्निंगला सुरवात होईल. 

 

कंपनीतर्फे विविध उपक्रम

शाळेतील ३०० मुलांना शालोपयोगी साहित्याचे वितरणही उद्या होईल. पर्यावरण संतुलनासाठी न्यू इंग्लिश स्कूल, जिल्हा परिषद मराठी शाळा व गावात ५०० वृक्षांची लागवड करून गाव हरित करण्याचा मानसही कंपनीने व्यक्त केला. शालेय उत्कर्षाबरोबरच कंपनीने गावासह परिसरातील नेत्ररुग्णांची मोफत तपासणी करून त्यांना चष्मे देण्यासाठीही निधी मंजूर केला. मध्यवर्ती वॉटर ट्रीटमेंट प्लांट, डासांच्या त्रासापासून गावाचे संरक्षण करण्यासाठी ‘फॉगिंग मशिन’, एक हजार विविध पुस्तकांचा समावेश असलेले सुसज्ज वाचनालयही गावासाठी सुरू करण्याचा युवराज तोरवणेंचा प्रयत्न आहे.

Web Title: The goal of the school's mad young beheda 'e-learning'