प्रथम प्रबोधन नंतर दंडात्मक कारवाई 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 एप्रिल 2017

पंचवटी - गोदावरी स्वच्छतेबाबत उच्च न्यायालयाने खंबीर भूमिका घेतली आहे. त्याबाबत उदासीन असलेल्या अन्य यंत्रणाही तत्पर झाल्या आहेत. महापालिकेसह पोलिस प्रशासनानेही लक्ष दिल्याने गोदावरीचे रूपडे हळूहळू पालटत आहे, हे नक्की. प्रशासनाच्या याच सकारात्मक भूमिकेमुळे रामकुंडापासून रोकडोबा मंदिरापर्यंत गोदावरीचा परिसर चकाचक झाल्याचे चित्र आहे. सध्या नदीपात्रात कपडे व गाड्या धुणाऱ्यांना समज देऊन त्यांचे प्रबोधन करण्यात येते. तरीही न ऐकल्यास दंडात्मक कारवाई केली जाते. 

गोदावरी प्रदूषणाबाबत गोदावरी गटारीकरणविरोधी मंचासह अन्य संघटनांनी सक्रिय होत प्रशासनाला स्वच्छतेसाठी साकडे घातले, पण नदीपात्रात सोडण्यात आलेल्या गटारांसह कपडे धुणे, गाड्या धुणे यामुळे स्वच्छता केवळ कागदावरच राहिली. गोदामाईच्या स्वच्छतेसाठी प्रशासनाचे उंबरे झिजवूनही कोडगी यंत्रणा दखल घेत नसल्याने अखेर याप्रश्‍नी मुंबई उच्च न्यायालयात गोदाप्रेमींनी याचिका दाखल केली. त्यानंतर न्यायालयाने याबाबत महापालिकेसह पोलिस यंत्रणेला फटकारत गोदावरी स्वच्छतेबाबत कान टोचले. यानंतर खडबडून जागे झालेल्या यंत्रणेने नदीच्या संरक्षणासाठी "पहारेकरी' नेमले. याचा सकारात्मक परिणाण आता दिसू लागला आहे. 

कपडे धुणाऱ्यांचे प्रबोधन 

गोदावरीच्या दोन्ही किनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर नागरी वस्ती आहे. हा सर्व भाग गावठाण भाग म्हणून ओळखला जातो. येथील अनेक जुन्या वाड्यांत अजूनही एकच नळकनेक्‍शन असल्याने केवळ पिण्यासाठी व अंघोळीसाठी पुरेल एवढेच पाणी उपलब्ध होते. त्यामुळे येथील महिला मोठ्या प्रमाणावर कपडे धुण्यासाठी गंगाघाटावर येतात. अशा कपडे धुणाऱ्या महिलांचे यंत्रणेकडून प्रथम प्रबोधन केले जाते. यासाठी महापालिकेसह विविध पोलिस ठाण्यांच्या गाड्या सकाळपासून रात्रीपर्यंत गस्तीवर असतात. निर्माल्य नदीपात्रात टाकू नये, यासाठी जागोजागी निर्माल्य कलशही ठेवले आहेत. त्याचाही सकारात्मक परिणाम दिसू लागला आहे. 

Web Title: Godavari river water pollution