‘गोधड्या शिवणार का?’ प्रश्‍नातून लाभली समृद्धीची ऊब

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जानेवारी 2017

डिलिव्हरिंग चेंज फोरमच्यावतीने भारतात २४ आणि २५ जानेवारीला मुंबईत आंतरराष्ट्रीय परिषद होत आहे. जगभरात उद्योग, प्रशासन, कला आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नेत्रदीपक बदल घडविणाऱया 'चेंज मेकर्स'चा सहभाग हे परिषदेचे वैशिष्ट्य आहे. दोन दिवसांच्या परिषदेत विविध विषयांवर चर्चासत्रे, नेटवर्किंग आणि ज्ञानाची देवाण-घेवाण होणार आहे. परिषदेच्या पार्श्वभूमीवर 'सकाळ' समुह महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी पाठपुरावा करीत असलेल्या क्षेत्रांमध्ये नेमके काय घडते आहे, काय घडवावे लागेल याचा विभागनिहाय आढावा घेत आहोत.
डिलिव्हरिंग चेंज फोरम
२४ व २५ जानेवारी २०१७ 
नेहरू सेंटर, मुंबई
अधिक माहिती व सहभागासाठी क्लिक करा
www.deliveringchangeforum.com

बचतगटांच्या माध्यमातून महिलांचा आर्थिक विकास घडवून सामाजिक बदलाचे स्वप्न रंगविणाऱ्या नीलिमा मिश्रा यांना गावच्या महिला विकासाबाबत वेगवेगळ्या कल्पना सुचविताना ‘आम्ही काय गोधड्या शिवायच्या का?’ असा प्रश्‍न विचारतात... या प्रश्‍नातूनच ‘गोधडी’ बनविण्याची संकल्पना आकार घेते... आणि पारोळा तालुक्‍यातील छोट्याशा बहादरपूरच्या ‘गोधडी’ला जागतिक सन्मान मिळतो...

आपल्या गावचा विकास करायचा म्हणून उच्चशिक्षण घेऊनही पारोळा तालुक्‍यातील बहादरपूर गावी स्थायिक होऊन हे परिवर्तन घडविण्यात मोलाचा वाटा उचलला तो नीलिमा मिश्रा या तरुणीने. शेतकरी, तरुण आणि विशेषत: ग्रामीण भागातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण झाले, तर गावाचे अनेक प्रश्‍न सुटू शकतात, याची नीलिमा यांना खात्री होती. या विचारातूनच त्यांनी ‘भगिनी निवेदिता ग्रामीण विकास निकेतन’ सुरू केले. महिलांचा आर्थिक व सामाजिक विकास साधण्यासाठी म्हणून त्यांचे काम बचतगटाच्या माध्यमातून सुरू झाले. 

परिवर्तनाच्या दिशेने... 
महिलांनी गावातच केलेल्या वस्तू महिलांनीच बाजारपेठेत विकायच्या, असे या बचतगटाने ठरविले. गोधडी खऱ्या अर्थाने उपयुक्त अशी वस्तू. मात्र, खेडवळ गोधडीला घेणार कोण? त्यासाठी या खेड्यातल्या गोधडीला आकर्षक नक्षीकामाचा साज चढवून त्याचे उत्कृष्ट पॅकिंग करण्याची कला त्यांनी बचतगटातील महिलांना शिकवली आणि घरात तयार झालेल्या गोधडीने आंतरराष्ट्रीय बाजारपेठ गाठली. सुरवातीला बचतगटाच्या या गोधडी निर्मितीचा व्याप मर्यादित होता. परंतु अल्पावधीत लोकप्रिय झालेली ही गोधडी नंतर ‘भाव’ खाऊ लागली व मागणी वाढत गेली. बचतगटाने कर्ज काढून उत्पादन सुरू केले व बहादरपूरच्या महिलांनी नीलिमा यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने क्रांती घडवून दाखवली. 

बहादरपूरचा झेंडा सातासमुद्रापार
केवळ गोधडीच नव्हे, तर बहादरपूरच्या महिलांनी आणखी वेगवेगळ्या वस्तू बनवून त्यादेखील बाजारपेठेत आणल्या. या सर्वच वस्तूंना चांगला प्रतिसाद मिळाला. यामुळे गावच्या महिलांना रोजगार मिळून आर्थिक उन्नती साधली गेली. केवळ आर्थिक उन्नती नव्हे, तर या क्रांतिकारी बदलाने बहादरपूरनेही कात टाकली. रोजगाराची समस्या दूर होऊ लागली, व्यसनाधीनता कमी झाली, शिवाय नागरिकांचा एकूणच सामाजिक स्तरही उंचावला. या कामाची दखल घेत नीलिमा मिश्रांना २०११ मध्ये ‘रेमन मॅगसेसे’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि बहादरपूरचा झेंडा सातासमुद्रापार रोवला गेला.

Web Title: godhadi business success