अत्याचार थांबतील तेव्हाच खरा महिला दिन 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 मार्च 2017

जुने नाशिक - आजच्या आधुनिक युगातही स्त्रीभ्रूणहत्या सुरू आहेत. डॉक्‍टरांकडून महिलांचे सक्तीने लिंग परीक्षण करून घेणे, त्यांच्यावर विविध प्रकारे होणाऱ्या अत्याचारामुळे आजही महिला स्वत:ला असुरक्षित समजत आहेत. ज्या दिवशी महिलांवर होणाऱ्या सर्व अत्याचारांना आळा बसेल, त्या समाजात मुक्त संचार करू शकतील, त्या दिवशी खऱ्या अर्थाने महिलांसाठी जागतिक महिला दिन असेल, असे मत मिसेस इंटरनॅशनल ऑफ इंडिया पुरस्कार विजेत्या सोनाली पवार यांनी व्यक्त केले. 

जागतिक महिला दिनानिमित्त महावीर इंटरनॅशनलतर्फे रोटरी क्‍लब हॉलमध्ये लाडली पुरस्काराचे वितरण झाले. त्या प्रसंगी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. 

मिसेस इंटरनॅशनल ऑफ इंडिया पुरस्कार विजेत्या सोनाली पवार यांच्या हस्ते राज्यातील 64 महिलांना पुरस्कार देण्यात आले. शिक्षण घेत असलेल्या चार वर्षांच्या मुलींपासून, तर विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या वृद्ध महिलांचा पुरस्कारार्थींमध्ये समावेश होता. 

जैन समाजाच्या जिल्हाप्रमुखपदी निवड झालेले मुकेश मुणोत यांच्यासह समाजासाठी सतत तत्पर असलेल्या पूनमचंद शाह, प्रदीप छोरिया, रुची नाहर यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

सोनाली पवार म्हणाल्या, ""मुलांना कुळाचा दिवा समजून महत्त्व दिले जाते. त्यामुळे गरोदर महिलांचे लिंग परीक्षण केले जाते. विशेषत: ग्रामीण भागात त्याचे प्रमाण जास्त आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. महिला सशक्त झाल्यास देशाचा विकास होण्यास नक्कीच मदत होणार आहे. अनेक महापुरुषांनीही महिलेच्या पदरी जन्म घेतला आहे. त्यामुळे समाजाने महिलांचे महत्त्व ओळखून त्यांचा सम्मान करावा. इतर सामाजिक संस्थांनीही महिलांच्या सन्मानासाठी विविध कार्यक्रम घेण्यात यावेत.'' 

या वेळी प्रतिला नहार, प्रमिला बेदमुथा, सरला धाडीवाल, कल्पना धाडीवाल, अनिल नहार, भारत गंग, प्रफुल्ल सुराणा, दिलीप पारख, संगीता बाफना, रूपचंद बागमार, दिलीप टाटिया, प्रकाश बोरा, राजेंद्र रंक, लोकेश पारख आदी उपस्थित होते. 

Web Title: Good day when women stop atrocities