शासनाचे नांदूरमध्यमेश्‍वर पक्षी अभयारण्याकडे दुर्लक्ष

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 डिसेंबर 2016

नाशिक - राष्ट्रीय दर्जा असलेल्या निफाड तालुक्‍यातील खाणगाव थडी येथील बंधाऱ्यावर वसलेल्या नांदूरमध्यमेश्‍वर या अभयारण्याकडे शासनाचे दुर्लक्ष असल्याचे सध्या चित्र पाहायला मिळत आहे. दरवर्षी थंडीची चाहूल लागताच येथे पक्षी गर्दी करतात, तसेच पक्षी निरीक्षक व पर्यटकांची हजारोंच्या संख्येने रोजची मांदियाळी येथे पाहायला मिळते.

नाशिक - राष्ट्रीय दर्जा असलेल्या निफाड तालुक्‍यातील खाणगाव थडी येथील बंधाऱ्यावर वसलेल्या नांदूरमध्यमेश्‍वर या अभयारण्याकडे शासनाचे दुर्लक्ष असल्याचे सध्या चित्र पाहायला मिळत आहे. दरवर्षी थंडीची चाहूल लागताच येथे पक्षी गर्दी करतात, तसेच पक्षी निरीक्षक व पर्यटकांची हजारोंच्या संख्येने रोजची मांदियाळी येथे पाहायला मिळते.

महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या अभयारण्याकडे पोचण्याकरिता दिशादर्शक फलक नाही. त्यामुळे नवीन पर्यटकांच्या रस्ता लक्षात येत नाही. मोठे वाहन घेऊन जाताना अडचण निर्माण होते. चांदोरी फाट्यापासून पुढे सायखेडा येथील रस्त्याची दुरवस्था आहे. गोदा-कादवा संगमस्थळी पक्ष्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो; पण अभयारण्य प्रशासनाने पक्ष्यांना त्रास होऊ नये म्हणून बोटिंग बंद केलेली आहे. तरी येथे बोटिंग सर्रासपणे केली जात आहे. त्याचा परिणाम पक्ष्यांच्या संख्येवर होत आहे. बोटिंगसाठी प्रत्येक व्यक्तीकडून शंभर रुपये आकारले जात आहेत; पण त्यात पर्यटकांच्या सुरक्षिततेची कोणतीही काळजी घेतली जात नाही. त्यामुळे येथे अपघात होण्याची शक्‍यता आहे.

शासनातर्फे पर्यटकांना पक्षी निरीक्षणासाठी बारा दुर्बिणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तरी गाईड पर्यटकांकडून त्याचे पैसे आकारत आहेत. संग्रहालयात पक्ष्यांची माहिती देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. वीस मिनिटांची फिल्म दाखविण्यात येते; पण पर्यटकांना याची माहितीच नसल्याने त्याचा लाभ घेता येत नाही. पक्षी निरीक्षणाचे लोखंडी मनोरे पाण्यात असल्याने शिड्यांना गंज लागलेला आहे. चापडगाव येथे पर्यटकांच्या विश्रांतीसाठी बनविलेल्या उद्यानात पिण्याच्या पाण्याची सोय नाही. प्रसाधनगृहात स्वच्छतेचा अभाव असल्याने पर्यटक त्याचा वापर टाळतात.

अभयारण्यातील पक्ष्यांना त्रास होऊ नये, यासाठी चार वर्षांपासून बोटिंग करणे बंद करण्यात आले आहे. मासेमारी करण्यावरही प्रतिबंध आहे.
- ल. टी. चौधरी, वनरक्षक, वन विभाग

नांदूरमध्यमेश्‍वर अभयारण्याचा प्रसार व प्रचार करण्याचे कार्य करतो, तसेच पर्यटकांना माहिती देण्यावर आम्ही भर देत आहोत. जास्तीत जास्त पर्यटक या ठिकाणी यावे, यासाठी आगामी काळातही जनजागृतीवर भर दिला जाणार आहे.
- किशोर खुटाळे, विभागीय लेखापाल, पर्यटन विभाग
 

नाशिकपासून नांदूरमध्यमेश्‍वर वाट दाखविणारा साधा दिशादर्शक फलकही दिसत नाही. त्यामुळे लोकांना विचारत जावे लागते. दुर्बिणीची सुविधा मोफत असतानाही पैसे द्यावे लागले.
- रमेश वळवी

पक्षी पाहण्याची आवड असल्याने मी दरवर्षी येथे येतो; परंतु आवश्‍यक अशी प्रसिद्धी न देण्यात आल्याने बऱ्याच लोकांना त्याची फारशी माहिती नाही.
- वैजनाथ लिंगायत

Web Title: government to ignore the bird sanctuary