कापडणे ग्रामपंचायतीवर ना पॅनल ना कोणाचा झेंडा ! 

जगन्नाथ पाटील   
Friday, 22 January 2021

श्रेय घेण्याचा कोणीही प्रयत्न करु नये, असे नवनिर्वाचितांनी म्हटले आहे. येथील ग्रामपंचायतीची १७ जागांसाठी निवडणूक झाली.

कापडणे : निवडणूकांमध्ये कार्यकर्त्यांना राबवून ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत झुंजी बघण्याची भूमिका नेत्यांनी घेतली. त्यामुळे आता श्रेयाच्या भानगडीत पडूच नका, असा सुचक इशारा कापडणे ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सदस्यांनी दिला आहे. कोणाचेही पॅनेल नव्हते, कोणाचाही पाठिंबा नव्हता, स्वकर्तृत्वानेच निवडून आल्याचा दावा बहुतांश सदस्यांनी केला आहे. 

आवश्य वाचा- एमजेपी‘च्या अधिकाऱ्यांना आरोपी करा; धुळे मनपा स्थायी समिती सभेत खराब रस्त्यांचा प्रश्न गाजला
 

कापडणे ग्रामपंचायत जिल्ह्यातील मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक आहे. येथील निवडणुकीकडे पूर्ण जिल्ह्याचे लक्ष होते. यामुळेच ‘ग्रामपंचायतीवर आमचेच वर्चस्व’ याबाबत दावे प्रतिदावे केले जात आहेत. मात्र कापडणे येथील दहापेक्षा अधिक उमेदवार स्वकर्तृत्वावर निवडून आले आहेत. त्यामुळे श्रेय घेण्याचा कोणीही प्रयत्न करु नये, असे नवनिर्वाचितांनी म्हटले आहे. येथील ग्रामपंचायतीची १७ जागांसाठी निवडणूक झाली. एक जागा बिनविरोध झाल्यानंतर १६ जागांसाठी मतदान झाले होते. बहुतांश तरुण आणि निर्व्यसनी उमेदवार निवडून आल्याने यंग ग्रामपंचायत अस्तित्वात आली आहे. 

आता विविध पक्ष नेत्यांमध्ये आणि स्थानिक नेत्यांमध्ये आमचेच उमेदवार निवडून आल्याचा श्रेयवाद सुरू झाला आहे. प्रत्यक्षात प्रचारासाठी कोणतेही नेते निवडणूक रिंगणात उतरले नाहीत. मदतही केली नाही. छुपी मदतही नसल्याचे उमेदवार सांगत आहेत. अशा नेत्यांनी आता श्रेय घेऊ नये. विशेष म्हणजे सोशल मिडियावर पॅनल आमचेच आले, अशा आशयाच्या पोस्ट व्हायरल होत आहेत. याबाबतीत टीकाटिप्पणी सुरू झालेली आहे. दरम्यान, येथे एकखांबी पॅनलच अस्तित्वात नव्हते. मग पॅनल कसे बरं त्यांचे आले? असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत. आता निवडून आलेले उमेदवार कोणाचा झेंडा हाती धरतात. याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून राहणार आहे. 

निवडून आलेले उमेदवार 
प्रभाग एक : हिम्मत चौधरी, नीलेश जैन व उज्वला माळी. प्रभाग दोन : महेश माळी वैशाली माळी व सोनी भील. प्रभाग तीन : जितेंद्र भील व अक्काबाई भील. प्रभाग चार : अमोल बोरसे, वैशाली पाटील व वंदनाबाई बोरसे (बिनविरोध). प्रभाग पाच : अंकिता पाटील, आशाबाई पाटील व हरीश पाटील. प्रभाग सहा : महेश पाटील, प्रवीण पाटील व अलकाबाई भामरे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gram panchayat election marathi news kapdne dhule gram panchayat not claim