अक्कलकुवा ग्रामपंचायतीत गैरव्‍यवहार; सीईओंचे कारवाईचे आदेश

अक्कलकुवा ग्रामपंचायतीत गैरव्‍यवहार; सीईओंचे कारवाईचे आदेश

नंदुरबार : अक्कलकुवा येथील ग्रामपंचायतीत सुमारे पावणेपाच कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार करत पंचायत समितीचे माजी उपसभापती इंद्रपालसिंग राणा यांनी कारवाईसाठी पंचायत समितीसमोर सुरू केलेल्या उपोषणाची दखल घेत जिल्‍हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांना प्राप्त झालेल्या अहवालानुसार काही बाबींमध्ये अनियमितता व काही ठिकाणी अपहार झाल्याचे निदर्शनास आल्याने अक्कलकुवा गटविकास अधिकारी यांना संबंधितांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. यामुळे राणा यांनी उपोषण स्थगित केले. 

अक्कलकुवा येथील ग्रामपंचायतीत विविध विकासकामांमध्ये अपहाराची तक्रार राणा यांनी जिल्‍हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानुसार चौकशी करून तत्कालीन प्रशासक, तत्कालीन सरपंच, विद्यमान सरपंच, तत्कालीन ग्रामविकास अधिकारी, तत्कालीन ग्रामसेवक यांना अंतिम कारणे दाखवा नोटिसा बजाविण्यात आल्या होत्या. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांना चौकशी अहवालही सादर झाला होता. या अहवालानुसार अक्कलकुवा ग्रामपंचायतीत विकास कामांमध्ये अनियमितता व अपहार झाल्याने संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाईची मागणी करण्यात येत होती. या मागणीच्या पूर्ततेसाठी इंद्रपालसिंग राणा यांनी पंचायत समितीसमोर उपोषण आरंभले. ही बाब गांभीर्याने घेऊन जिल्‍हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गटविकास अधिकारी यांना गोपनीय अहवालानुसार कारवाईचे आदेश दिले आहेत. कारवाईचे आश्वासन मिळाल्याने इंद्रपालसिंग राणा यांनी उपोषण स्थगित केले आहे. यावेळी गटविकास अधिकारी महेश पोतदार, नासीर बलोच, शिवसेना जिल्हाप्रमुख आमशा पाडवी उपस्थित होते. 

सरपंच, उपसरपंचावर 
अपात्रतेची टांगती तलवार 

तत्कालीन ग्रामविकास अधिकारी व्ही. व्ही. जाधव, तत्कालीन प्रशासक एम. आर. देव, तत्कालीन ग्रामविकास अधिकारी आनंदा पाडवी, तत्कालीन ग्रामसेवक सुखलाल कोळी यांच्यावर शिस्तभंग विषयक कारवाईसाठी विभागीय चौकशी प्रस्तावित करण्याचे नमूद केले आहे. तर अक्कलकुवा ग्रामपंचायतीचे सरपंच राजेश्वरी वळवी व तत्कालीन सरपंच तथा विद्यमान उपसरपंच ताज महंमद मक्राणी यांच्याविरुद्ध अपात्रतेचा सविस्तर प्रस्ताव नवीन विहित नमुन्यात विनाविलंब सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com