ई-मस्टर देण्यासाठी लाच घेणारा ग्रामसेवक जाळ्यात 

प्रल्हाद कांबळे
गुरुवार, 28 जून 2018

पाच हजाराची लाच घेणारा ग्रमसेवक एसीबीच्या जाळ्यात अडकला. नायगावमध्ये गुरूवारी (ता. २८) ही कारवाई करण्यात आली.  

नांदेड - एमजीएनईजीएस या योजनेंतर्गत मंजूर सिंचन विहीरीवरील कार्यरत मजुरांच्या हजेरी पटावर स्वाक्षरी करून ई- मस्टर देण्यासाठी पाच हजाराची लाच घेणारा ग्रमसेवक एसीबीच्या जाळ्यात अडकला. नायगावमध्ये गुरूवारी (ता. २८) ही कारवाई करण्यात आली.  

नायगाव तालुक्यातील मरवाडी/ खैरगाव या जोड ग्रामपंचायतमध्ये माणिक नारायण श्रीरामे हा ग्रामसेवक म्हणून कार्यरत होता. या ग्रामपंचायतीअंतर्गत राहणाऱ्या एका शेकऱ्याला एमजीएनईजीएस या योजनेंतर्गत विहीर मंजूर झाली. त्या विहीरवर काम करणाऱ्या कामगारांना मजुरी देण्यासाठी ग्रामसेवकाच्या स्वाक्षरीची गरज असते. संबंधीत लाभार्थी व त्याचा भाऊ ग्रामसेवक श्रीरामे यांच्याकडे गेले. परंतु या कामासाठी त्यांनी सात हजाराची लाच मागितली. तडजोडअंती पाच हजार लाच देण्याचे ठरले. मात्र लाच देऊ न इच्छिणाऱ्या लाभार्थ्यानी नांदेड येथे येऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभागात १४ जून ला तक्रार दिली. यावरून या विभागाच्या पथकांनी पडताळणी सापळा लावला. यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने गुरूवारी (ता. २८) दुपारी नायगाव बसस्थानक रस्त्यावर अझहरी उडपी हॉटेल परिसरात सापळा लावला. यावेळी ग्रामसेवक श्रीरामे हा पाच हजाराची लाच घेताना अलगद एसीबीच्या सापळ्यात अडकला. त्याच्याविरूध्द नायगाव ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: Gramsevak trapped in a bribe to give e muster