बोहल्यावर चढण्यापूर्वीच नवरदेवाचा अपघाती मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 एप्रिल 2018

सटाणा : येत्या पंधरा दिवसांत-ता.२५ एप्रिलला लग्न होणार असलेल्या नवरदेवाचा बोहल्यावर चढण्यापूर्वीच एका रस्ता अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना चौंधाणे (ता.बागलाण) येथे काल मंगळवारी (ता.१०) मध्यरात्री घडली.

सटाणा : येत्या पंधरा दिवसांत-ता.२५ एप्रिलला लग्न होणार असलेल्या नवरदेवाचा बोहल्यावर चढण्यापूर्वीच एका रस्ता अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना चौंधाणे (ता.बागलाण) येथे काल मंगळवारी (ता.१०) मध्यरात्री घडली.

चौंधाणे येथे काल रात्री गावाजवळ असलेल्या अवघड वळणावर ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील देवेंद्र सुरेश भामरे (वय २७ रा.वनोली ता.बागलाण हल्ली मुक्काम नाशिक) या युवकाचा जागीच मृत्यू झाला. देवेंद्रचा बेज (ता. कळवण) येथील युवतीशी विवाह होणार होता. लग्नाची तयारी सुरु असतानाच कंधाणे येथे मामाला भेटण्यासाठी जातांना निलेशचा अपघाती मृत्यू झाल्याने भामरे परिवारावर शोककला पसरली आहे.

याबाबत सटाणा पोलिसांनी दिलेली माहिती अशी, काल मंगळवारी रात्री उशिरा सौंदाणे (ता. मालेगाव) येथे महावितरण मध्ये विद्युत सहाय्यक पदावर असलेला देवेंद्र भामरे आपली ड्युटी आटोपून पल्सर (क्र.एम.एच. ४१ ए.जे. ९९७८) वरून मामाला भेटण्यासाठी कंधाणे येथे निघाला असता त्याला चौंधाणे गावाजवळील तीव्र वळणावर ट्रकने (क्र.एम.एच. ०४ सी.यु. ६५०२) ने जबर धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की पल्सरचे दोन तुकडे होवून देवेंद्र दूरवर फेकला गेला आणि त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

गेल्या बारा ते पंधरा महिन्यांपुर्वीच देवेंद्र भामरे यांच्या वडीलांचा करंजाड (ता.बागलाण) जवळ अपघातात मृत्यु झाला होता. कुटुंबाची संपुर्ण जबाबदारी त्याच्यावर होती. बहिणीच्या लग्नाचे स्वप्न उराशी घेऊन तो वडीलांच्या धक्क्यातुन बाहेर पडुन कुटूंबाला सावरत होते. देवेंद्र हा कुटुंबातील एकुलता एक कर्ता पुरुष असल्यामुळे त्याच्या अपघाती निधनामुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. येत्या २५ एप्रिल रोजी देवेंद्रचा विवाह असल्याने घरात लग्नाची जोरदार तयारी सुरु होती. मात्र नियतीला ते मान्य नव्हते. एकीकडे लग्नाच्या तयारीत भामरे कुटुंबीय व्यस्त असतानाच निलेशचा अपघाती मृत्यू झाल्याने भामरे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. निलेशचे कुटुंबीय नाशिक येथे राहत असल्याने आज सकाळी नाशिक येथे निलेशवर अंतिम संस्कार करण्यात आले.

पोलिसांनी अपघाताला कारणीभूत ठरलेला ट्रक ताब्यात घेतला असून ट्रकचालक मात्र फरार झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश बुवा करीत आहेत.
 

Web Title: groom accident before wedding