गुजरात इन्फोटेकची 10 लाखांची बॅंक गॅरंटी जप्त 

गुजरात इन्फोटेकची 10 लाखांची बॅंक गॅरंटी जप्त 

नाशिक - डिजिटल सेवांच्या नावाखाली विद्यार्थी-पालकांच्या खुलेआम लुटीचा "सकाळ'ने मंगळवारी (ता. 18) पर्दाफाश केला. सेतूच्या "टेंडर'चे गौडबंगाल चव्हाट्यावर आणले. त्याची दखल घेत जिल्हा प्रशासनातर्फे करार संपूनही शहर आणि तालुक्‍यातील सेतू केंद्रे चालवत जनतेला वेठीस धरल्याबद्दल अहमदाबादच्या गुजरात इन्फोटेक कंपनीची दहा लाखांची बॅंक गॅरंटी जप्त करण्याचा निर्णय घेतला. तसेच मंगळवारपासून शहरातील नाशिक रोड, पंचवटी, सातपूर, सिडको ही चारही सेतू केंद्रे बंद करण्याचे आदेश देण्यात आले. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी याबद्दलची माहिती दिली. 

सेतू केंद्रे बंदचे आदेश निघताच, काही केंद्रांवरील कर्मचाऱ्यांनी गाशा गुंडाळल्याने दाखल्यांसाठी केंद्रांभोवती फिरणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे धाव घेण्यास सुरवात केली. गुजरात इन्फोटेकला सेतू केंद्रासाठी देण्यात आलेली मुदत 31 मार्च 2019 ला संपली. त्यानंतर दोन वर्षांसाठी मुदतवाढ देण्यात येईल, असे करारात असले, तरीही लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात ती देता आली नाही. नवीन निविदा काढता न आल्याने 23 मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मूळ अटी-शर्तींनुसार काम करणे बंधनकारक राहील, असे जिल्हा प्रशासनातर्फे आदेशात स्पष्ट करण्यात आले होते. त्यानंतरही केंद्रे खुलेआम सुरू असल्याचे "सकाळ'च्या बातमीदारांच्या "सेतू केंद्रांवर एक दिवस' यातून पुढे आले. हे कमी काय म्हणून सरकारने प्रत्येक दाखल्यासाठी 33 रुपये 60 पैसे शुल्क निश्‍चित केलेले असताना शंभर ते दोनशे रुपये उकळले जात असल्याचे चित्र पुढे आले. प्रत्यक्षात मात्र "मूँह मागे किंमत' देऊनही प्रवेशासाठी दाखले मिळत नसल्याने विद्यार्थी अन्‌ पालकांमध्ये असंतोष उफाळून आला. 

सर्वांना दाखले मिळतील - मांढरे 
मांढरे यांनी उपजिल्हाधिकारी डॉ. अरविंद अंतुर्लीकर यांच्याकडून सेतू केंद्रांचा आढावा घेतला आणि गुजरात इन्फोटेकवर कारवाईचे आदेश दिले. बॅंक गॅरंटी जप्तीच्या पहिल्या कारवाईचे आदेश मांढरे यांनी दिले आहेत. मांढरे म्हणाले, की कंत्राट संपल्यानंतर कंपनीने स्वतःहून केंद्र बंद करायला हवे होते. प्रशासनातर्फे त्यांचे लॉगिन बंद केले होते. मात्र तरीही कर्मचारी परस्पर कागदपत्रे जमा करून, स्कॅन करून ऑनलाइनची कामे करत असल्याचे दिसत आहे. मागील पंधरा दिवसांमध्ये ज्यांनी अर्ज केले आहेत आणि ज्यांची प्रकरणे जिल्हा प्रशासनाकडे ऑनलाइनने प्राप्त झाली आहेत व दाखल्यांसाठी शुल्क भरले आहे, अशा सर्वांना त्यांचे दाखले बुधवार (ता. 19)पासून देण्याची कार्यवाही सुरू केली जाईल. याशिवाय बंद केलेल्या सेतू केंद्रात बुधवारपासून पर्यायी व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दाखले देण्याची कार्यवाही केली जाणार असल्याने कुणीही घाबरून जाऊ नये. 

सिडकोत अर्ज स्वीकारणे बंद 
सेतू केंद्रांच्या भोंगळ कारभाराला "सकाळ'ने वाचा फोडताच, सिडकोतील केंद्रात नवीन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया बंद करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी ई-महा-सेवा केंद्रांत दाखल्यांसाठी गर्दी केली. अश्‍विन सेक्‍टरमधील छत्रपती संभाजी महाराज स्टेडियममधील केंद्र सुरू करण्याचे आदेश येत नाहीत, तोपर्यंत नवीन अर्ज घेण्यात येणार नाहीत. तरीही मागील प्रलंबित अर्ज निकाली काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असे केंद्राचे चालक सागर कोठावदे यांनी म्हटले. 

सातपूरमधील दलाल फरारी 
महापालिकेच्या सातपूर विभागीय कार्यालयाशेजारील सेतू केंद्राच्या बाहेर खुलेआम फिरणारे दलाल फरारी झाले. या केंद्रात कर्मचाऱ्यांची संख्या वाढल्याचे चित्र दुपारी पाहायला मिळाले. विशेष म्हणजे, केंद्रात दाखल्यांसाठी येणाऱ्या प्रत्येकाची विचारपूस केली जात होती. गेल्या अनेक महिन्यांपासून तुंबलेल्या अर्जांवर प्रक्रिया होऊन दाखले विद्यार्थी-पालकांसह कष्टकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी कर्मचाऱ्यांची धावपळ चालली होती. 

पंचवटीत करासह 35 रुपये 
पंचवटीतील सेतू केंद्रात एका दाखल्यासाठी करासह 35 रुपये आकारले जात असल्याचे चित्र मंगळवारी पाहावयास मिळाले. नाना वाघ यांच्याकडून हे शुल्क आकारले गेले. तारवालानगरमधील या केंद्रात दाखल्यांसाठी प्रतीक्षा करावी लागेल, असे केंद्रातील कर्मचारी सांगत होते. या केंद्रावर दाखल्यांसाठी गर्दी उसळली होती. त्याचप्रमाणे केंद्रातील कर्मचारी "सर्व्हर डाउन' असल्याचे कारण दाखल्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाला सांगत होते. केंद्रातील कर्मचाऱ्यांनी नवीन अर्ज स्वीकारले, मात्र ऑनलाइनसाठी पुन्हा यावे, असे आवर्जून सांगितले जात होते. हे कमी काय म्हणून काही अडचण असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क साधावा, अशी पुस्ती जोडली जायची. रहिवासी दाखल्यासाठी अर्ज करूनही न मिळाल्याने नव्याने अर्ज करण्याचा सल्ला केंद्रातील कर्मचाऱ्यांनी दिला. यश शिंपी म्हणाले, की रहिवासी दाखल्यासाठी काही दिवसांपासून चकरा मारतोय. यापूर्वी सेतू केंद्रात असलेल्या कर्मचाऱ्यांकडे जमा केलेली कागदपत्रे मिळाली नाहीत. त्यामुळे पुन्हा अर्ज करावा लागला. मात्र सर्व्हर डाउन असल्याचे सांगितले. 

नाशिक रोडला कर्मचारी गायब 
नाशिक रोड येथील विभागीय आयुक्तालयाशेजारी सेतू केंद्रात मंगळवारी दुपारी संगणक सुरू होते. मात्र केंद्रातील कर्मचारी गायब होते. अशातच, दाखल्यांसाठी विद्यार्थी-पालकांच्या झालेल्या गर्दीत "मलिदा' लाटण्यासाठी दलालांचा सुळसुळाट झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. दाखले मिळत नाहीत, प्रशिक्षित मनुष्यबळ नाही, खिडक्‍यांना फलक नसल्याने व्यवस्थित माहिती मिळत नाही, अशा तक्रारींचा पाढा उपस्थितांमधून वाचला गेला. 

गेल्या पंधरा दिवसांपासून उत्पन्नाचा दाखला मिळत नसल्याने मुलांच्या शिक्षणाचा खोळंबा होण्याची भीती वाटू लागली. आमच्या वेदनांना "सकाळ'ने वाचा फोडल्याने त्याचा चांगला परिणाम होईल, असा विश्‍वास वाटतो. 
-राकेश गांगुर्डे (पालक) 

उत्पन्नाचा दाखला गेल्या वीस दिवसांपासून मिळालेला नाही. ही व्यथा "सकाळ'मधून व्यक्त झाली. त्याची दखल प्रशासनातर्फे घेतली जाईल आणि आम्हाला न्याय मिळेल अशी आशा आहे. 
-रोहित निकम (विद्यार्थी, अभियंतानगर, सिडको) 

नॉन क्रिमिलिअर दाखल्यासाठी गेल्या दीड महिन्यापासून चकरा मारत होतो. आज तहसीलदार कार्यालयात जाऊन आलो. तेव्हा माझ्या अर्जावर "थम' अपलोड करून पुढील कार्यवाही झाली. त्यानंतर केंद्रात माहिती घेतल्यावर काही वेळात दाखला मिळेल, असे सांगितले गेले. 
-आदित्य धनवटे (विद्यार्थी, सातपूर) 

सेतू केंद्रात कधी सर्व्हर डाउन, तर कधी अधिकारी नाहीत, असे सांगून वेळ मारून नेली जात होती. एखाद्याला खूप आवश्‍यकता आहे म्हटल्यावर थेट "फिरोज'ला भेटा, असे सांगितले जायचे. हे असे किती दिवस चालणार? 
-ओंकार जाधव (विद्यार्थी, सातपूर) 

सेतू केंद्रात उत्पन्नाच्या दाखल्यासाठी दोन महिन्यांपासून येतोय. प्रत्येक वेळी "साहेब गावाला गेले आहेत', "साहेबांच्या बदल्या झाल्या आहेत' असे कारण सांगितले गेले. पण एका दाखल्यासाठी महाविद्यालयाची प्रवेशप्रक्रिया संपेल आणि वर्ष वाया जाईल, याची काळजी कुणालाच कशी नाही, असे सातत्याने वाटते. 
-जयंत शिंदे (नाशिक रोड) 

मी व माझा मुलगा आदित्य डोमिसाइल, नॉन क्रिमिलिअर हे दाखले काढण्यासाठी 30 मेस अर्ज दाखल केला. शुल्क भरले, पण दाखल्यांसाठी "तारीख पे तारीख' संपायला तयार नाही. आजअखेर आम्हाला दाखले मिळालेले नाहीत. 
-संजय सोनार (नाशिक रोड) 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com