सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील भ्रष्टाचारी - एकनाथ खडसे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 मार्च 2017

जळगाव - राज्याचे सहकार राज्यमंत्री व शिवसेनेचे उपनेते गुलाबराव पाटील हे भ्रष्टाचारी असून, त्यांनी जिल्हा सहकारी बॅंकेत खोटी कागदपत्रे देऊन शेतीवर एक कोटीपेक्षा अधिक रकमेचे अनुदान लाटले आहे, अशा शब्दांत भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी आज आपल्याच सरकारमधील राज्यमंत्र्यांवर तोफ डागली. यावरून आता राज्यभर भाजपविरुद्ध शिवसेना नेत्यांचा कलगीतुरा रंगत जाणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

राज्यमंत्री पाटील यांनी आपल्यावर जिल्हा बॅंकेत दीडशे कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी पुराव्यानिशी सिद्ध करावा, अन्यथा त्यांच्याविरुद्ध आपण लवकरच अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार आहोत, असेही खडसे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत नोटाबंदीच्या काळात चोपडा शाखेत झालेल्या नोटाबदलीप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी दोन दिवसांपूर्वी बॅंकेच्या अधिकाऱ्यांची सीबीआयतर्फे चौकशी करण्यात आली. जिल्हा बॅंकेवर सध्या खडसे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलची सत्ता आहे. त्यांच्या कन्या ऍड. रोहिणी खडसे-खेवलकर या बॅंकेच्या चेअरमन आहेत. सीबीआय चौकशीवर प्रतिक्रिया देताना सहकार राज्यमंत्री पाटील यांनी खडसेंनी बॅंकेत नोटाबंदी काळात दीडशे कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. यावर खडसे म्हणाले, की नोटाबंदीच्या काळात बदल झालेल्या नोटाप्रकरणी सीबीआयकडे तक्रार दाखल आहे. त्यावर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी जळगाव येऊन बॅंकेच्या अधिकाऱ्यांची चौकशीही केली. ही चौकशी सुरू असताना राज्यमंत्र्यांनी या प्रकरणात आरोप करून एक प्रकारे सीबीआयवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे.

न्यायालयात खेचणार
खडसे म्हणाले, की नोटाबंदीच्या काळात आपण दीडशे कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्यावर केला आहे. या प्रकरणी कोणताही पुरावा असेल, तर त्यांनी तो द्यावा. त्यांनी तसा पुरावा दिला नाही, तर या प्रकरणात त्यांच्यावर न्यायालयात अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार आहे. याअगोदर त्यांच्यावर आपला पाच कोटींचा दावा न्यायालयात प्रलंबित आहे.

Web Title: gulabrao patil corrupted