निलंबित न्यायाधीशाला सक्तमजुरीची शिक्षा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 डिसेंबर 2016

बाललैंगिक अत्याचाराचे प्रकरण 

सोलापूर : बाललैंगिक अत्याचार प्रकरणात निलंबित न्यायाधीश नागराज सुदाम शिंदे (वय 38, रा. चिंतामणी सोसायटी, पुणे) यास तीन वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा विशेष न्यायाधीश मंगला धोटे यांनी शुक्रवारी सुनावली. 

बाललैंगिक अत्याचाराचे प्रकरण 

सोलापूर : बाललैंगिक अत्याचार प्रकरणात निलंबित न्यायाधीश नागराज सुदाम शिंदे (वय 38, रा. चिंतामणी सोसायटी, पुणे) यास तीन वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा विशेष न्यायाधीश मंगला धोटे यांनी शुक्रवारी सुनावली. 

नागराज हा मूळचा अरण (ता. माढा) येथील तर पीडित मुलगी ही उपळाईची आहे. ओळखीतून त्यांचे एकमेकांच्या घरी येणे-जाणे होते. पुण्यात दोघे एकाच सोसायटीत रहायला होते. नागराज याची पत्नी प्रसूतीसाठी बार्शी येथे गेली होती. नागराज याने पीडित मुलीला ओळखीच्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेचे क्‍लास लावून देतो, नवीन मोबाईल व सोन्याच्या रिंगा घेऊन देतो, तुझ्या नावावर फ्लॅट करून देतो असे आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी दुष्कर्म केल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता. पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली होती. नागराजने जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत पाठपुरावा केला. अखेर सर्वोच्च न्यायालयानेही जामीन फेटाळल्यानंतर तो न्यायालयात हजर झाला होता. या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने अकरा तर बचाव पक्षाच्या वतीने आठ साक्षीदार तपासण्यात आले. सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल डिटेल्स, एसएमएस असे परिस्थितीजन्य पुरावे तसेच पीडित मुलगी, तिची आई आणि तपास अधिकाऱ्यांची साक्ष झाली होती. साक्ष आणि परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने नागराजला बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध अधिनियमानुसार शिक्षा ठोठावली, अशी माहिती आरोपी शिंदेचे वकील बाबासाहेब जाधव यांनी दिली आहे. यात सरकारतर्फे ऍड. प्रताप परदेशी यांनी काम पाहिले. 

Web Title: Hard labor suspended the judge