आजींच्या हृदयाचे पुन्हा टिक्‌टिक्‌ 

आजींच्या हृदयाचे पुन्हा टिक्‌टिक्‌ 

नाशिक - सिक्‍स सिग्मा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागातून ७० वर्षांच्या आजींच्या बंद पडलेल्या हृदयाविषयीची माहिती भ्रमणध्वनीवरून मिळाली. रुग्णालयात पोचल्यावर प्रयत्न करूनही हृदय बंद पडल्याचे दिसले. मग तातडीने शस्त्रक्रिया केली अन्‌ सहा तासांनी आजींनी डोळे उघडले. हृदयशस्त्रक्रियेतील एक तपाहून अधिक काळाची तपश्‍चर्या असलेले डॉ. नितीन कोचर यांनी ही माहिती दिली.

डॉ. कोचर म्हणाले, की एका रविवारी सकाळी आजींच्या हृदयाचे स्पंदन बंद पडले असून, अतिदक्षता विभागातील डॉक्‍टर आणि ‘स्टाफ’ने ती पुन्हा सुरू केले आहे, अशी माहिती मिळाली. आजींना अतिदक्षता विभागात हलविण्यात आले होते. रुग्णालयातील कार्डिऑलॉजीची ‘टीम’ तयार होती. डॉ. प्रशांत पवार आणि डॉ. निर्मल कोलते यांनी आजींचा ‘टुडी इको’ केला होता. त्यात हृदयातील एका झडपेचा व्हॉल्व्ह छोटा झाला होता. शरीराला थोडा रक्तपुरवठा होत होता. आजींची तत्काळ झडप बदलण्याची शस्त्रक्रिया करावी लागणार होती. रुग्णालयात पोचून पाहतो, तर काय? आजींचे हृदय पुन्हा एकदा बंद पडले होते. हृदय सुरू करण्याचे प्रयत्न सुरू होते. १५ शॉक दिल्यानंतर हृदय सुरू करण्यात यश मिळाले. आजींना कॅथलॅबमध्ये अँजिओग्राफीसाठी नेले. मग शस्त्रक्रिया विभागात नेण्यात आले. इथेही हृदय बंद पडले. क्षणाचाही विलंब न लावता, हृदय सुरू करत कृत्रिम हार्ट लंग मशिनला जोडले. मग महारोहिनी उघडून त्यातील व्हॉल्व्ह बदलला. तद्‌नंतर आजींचे हृदय सुरू झाले. कृत्रिम हार्ट लंग मशिनपासून हळुवारपणे हृदय बाजूला करण्यात आले. शस्त्रक्रिया झाल्यावर आजींना अतिदक्षता विभागात नेण्यात आले. आजींनी डोळे उघडल्यावर आमच्या साऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची लकेर उमटली, असेही त्यांनी सांगितले.

सहा हजारांहून अधिक शस्त्रक्रिया
डॉ. कोचर महिन्याला शंभर ते सव्वाशे हृदयशस्त्रक्रिया करतात. त्यातील आजींची हृदयशस्त्रक्रिया स्मरणात राहणारी ठरल्याचे सांगून डॉ. कोचर म्हणाले, की आजींचे नातेवाईक आमच्या सर्वांचे आभार मानायला थकत नव्हते. रुग्णालयाबाहेर आलो तर अंधार झाला होता. दिवस संपला होता. पण आजींचा जीव वाचल्याने क्षीण केव्हाच पळून गेला होता. ‘टीम’मधील डॉ. नागेश, डॉ. टिपरे, डॉ. स्वप्नील, डॉ. प्रशांत, डॉ. मंदार, डॅनियल, दर्शना, विशाल, सुनील, मोती अशा साऱ्यांचे आभार मानत मी घरी गेलो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com