
Dhule News : शिंदखेड्यात उपोषणकर्त्यांची तब्येत ढासळली
शिंदखेडा : येथील तहसील कार्यालयासमोर शिवसेनेचे (ठाकरे गट) जिल्हा उपप्रमुख शानाभाऊ सोनवणे विविध १२ मागण्यांसाठी २६ जानेवारीपासून तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसले असून, रविवारी (ता. २९) चौथा दिवस होता. या चार दिवसांत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला आहे.
दररोज ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी तपासणी करीत असून, रविवारी उपोषणकर्ते शानाभाऊ सोनवणे व रावसाहेब ईशी यांच्या शरीरातील साखरेचे प्रमाण व वजन कमी झाले आहे. त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल होणे गरजेचे आहे, असे वैद्यकीय अधिकारी डॉ. विनय पवार यांनी सांगितले; परंतु उपचार घेण्यास शानाभाऊ सोनवणे यांनी नकार दिला. आपल्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आपण उपोषणस्थळ सोडणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. (Health of hunger strikers deteriorated in Shindkheda Dhule News)
उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आशा गांगुर्डे, पोलिस निरीक्षक सुनील भाबड यांनी उपोषणकर्ते सोनवणे यांची भेट घेऊन आपल्या स्थानिक मागण्यांसाठी ३१ जानवारीला बैठक घेऊन स्थानिक समस्या सोडविण्यात येतील, वरिष्ठ स्तरावरील समस्येसाठी शासनाशी पत्रव्यवहार करण्यात येईल व उपोषण सोडण्याची विनंती केली. त्यास श्री. सोनवणे यांनी नकार देत अगोदर बैठक बोलवा व त्यावर निर्णय घ्या मग उपोषण सोडेन यावर ठाम राहिल्याने उपोषण सोडण्यावर कुठलाही तोडगा निघू शकला नाही.
हेही वाचा : ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा
उपोषणकर्ते शानाभाऊ सोनवणे यांना बंदोबस्त देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनाचा आशय असा : उपोषणकर्त्यांना कुठलीही सुरक्षा नाही. यापूर्वीदेखील ठार करण्याची धमकी, अपघात करून घातपात करण्याची धमकी, फोनवरून धमकी देणे या संदर्भात पोलिस प्रशासनाला तक्रार करूनदेखील कुठलाही उपयोग झाला नाही. उपोषणाला चार दिवस झाले असून, प्रशासनाला कुठल्याही प्रकारची जाग आलेली नाही, पक्षात व विविध लोकप्रतिनिधी पदावर आमदारकी, पंचायत समिती मतदार क्षेत्रात लढलेले व कार्यरत असलेले महत्त्वाचे नेते आहेत; परंतु आंदोलकांची कुठलीही दखल व सुरक्षा घेण्यास येत नाहीत, असे निवेदनात म्हटले आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत गोरडे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
अज्ञातांकडून हल्ला
तिसऱ्या दिवशी शनिवारी (ता. २८) मध्यरात्री अज्ञातांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला असून, गौतम कोळी यांनी हटकल्यानंतर संबंधित बंदूकधारी अज्ञात व्यक्तीने पळ काढला. उपोषणकर्त्यांना कुठलेही पोलिस संरक्षण नसल्याच्या आरोप करीत ठाकरे गटाच्या शिवसेना गटाने शिंदखेडा पोलिस ठाण्याला निवेदन दिले असून आहे.