धुळे जिल्ह्यात पावसासह पुराचा कहर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

धुळे जिल्ह्यात अनेक गावांत पाणी शिरले असून बरेच पूल पाण्याखाली गेल्याने संपर्क तुटला असून वाहतूक खंडित झाली आहे.

धुळे : धुळे जिल्ह्यात अनेक गावांत पाणी शिरले असून बरेच पूल पाण्याखाली गेल्याने संपर्क तुटला असून वाहतूक खंडित झाली आहे.

वेध शाळेने वर्तविलेला अनुमान खरा निघाल्याने सतर्क जिल्हा सरकारी यंत्रणेने आज (शुक्रवार) प्रमुख नद्यांकाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात केल्याने अनुचित घटनांना पायबंद बसू शकला. अशात जामखेली नदीच्या पुरात गुलाब घरटे (वय 53) वाहून गेल्याची भीती व्यक्त होत आहे. पांझरा नदीला पूर आल्याने धुळे शहरालगतच्या काठावरील नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले.

धुळे जिल्ह्यात चारही तालुक्‍यात गेल्या 36 ते 40 तासांपासून संततधार सुरू होती. साक्री, शिरपूर, शिंदखेडा, धुळे तालुक्‍यात पावसाचा जोर वाढल्याने नदी, नाले, प्रकल्प भरून वाहू लागले. नंतर पूरस्थिती निर्माण झाली. तापी, पांझरा, बुराई, कान, अनेर, अरूणावतीसह विविध नद्यांना पूर आला आहे. अक्कलपाडा प्रकल्पातून 58 हजार क्‍सुसेसने पाणी सोडण्यात आल्यामुळे पांझरा नदीला मोठा पूर आला असून काठालगतच्या नागरिकांना इतरत्र स्थलांतरित करण्यात आले आहे. चावडदेच्या ग्रामस्थांना निमगुळ, टाकरखेडा येथे स्थलांतरित केले जात आहे.

भटाणे, आढे, साक्रीतील नवकारनगर, धुळे शहरात नदीकाठच्या रहिवास क्षेत्रात पाणी शिरले आहे. कासारेत तिसऱ्यांदा पाणी गेले असून अनेक दुकाने पाण्याखाली आहेत. या गावाचा साक्रीशी संपर्क तुटला आहे. त्याचप्रमाणे तिसगाव- ढंढाणेचाही संपर्क तुटला आहे. खर्दे येथे अरुणावती नदी पात्राला आलेल्या पुरात 50 ते 60 झोपड्या, वीटभट्ट्या वाहून गेल्या आहेत. आरावे येथे अनेक घरात बुराई नदीचे पाणी शिरले आहे. साक्री- पिंपळनेर, करवंद- लौकी, खर्दे- अरुणावती, चिकसे, शिंदखेडा- बुराई, कासारे- साक्री, धुळे शहरातील चार पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक खंडित झाली आहे. या क्षेत्रातील संपर्क तुटला आहे. वेध शाळेच्या अनुमानानुसार पुरस्थितीची पूर्वकल्पना असल्याने जिल्हा प्रशासनाने आज सकाळीच शाळा बंद करण्याची सूचना पारित केली. त्यामुळे पूर वाढण्यापूर्वीच विद्यार्थी सुरक्षितपणे घरी जाऊ शकले. साक्रीत पावसाचा जोर, अक्कलपाडा प्रकल्पातून पाणी सोडण्यात आल्याने धुळे शहरातील पांझरा नदीला मोठा पूर असल्याने स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळा, शिवाजी रोडवरील श्री स्वामी समर्थ मंदिरापर्यंत पाणी आले आहे. सुरक्षिततेसाठी मोठ्या पुलावरील वाहतूक खंडित केली जात आहे. साक्रीतील पावसाचा जोर ओसरला की धुळे शहरातील पूर कमी होऊ शकेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: heavy rain at dhule district