इगतपुरी तालुक्‍यात पावसाची जोरदार हजेरी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 जून 2019

इगतपुरीत सातत्याने हुलकावणी देणाऱ्या पावसाने बुधवारी (ता. २६) दुपारी साडेचारला दमदार हजेरी लावली.

इगतपुरी शहर - इगतपुरीत सातत्याने हुलकावणी देणाऱ्या पावसाने बुधवारी (ता. २६) दुपारी साडेचारला दमदार हजेरी लावली. त्यामुळे बळीराजादेखील सुखावला आहे. तांदळाच्या पठारावर बियाणे पेरणी होऊनही पावसाने पाठ फिरविल्याने चिंताग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण पसरले आहे.

गेल्या महिनाभरापासून उष्णतेचा सामना करणाऱ्या नागरिकांना या पावसामुळे दिलासा मिळाला आहे. इगतपुरी शहरासह ग्रामीण भागातील भावली, मानवेढे, बोरली, नांदगाव सदो, आवळखेड, पारदेवी, बलायदुरी, टाके, बोरटेंभा परिसरात जोरदार पाऊस पडला. त्यामुळे मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक संथगतीने  सुरू होती. 

शहरातील बाजार परिसरात व्यावसायिकांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली. ग्राहकांनी ऐनवेळी लहान-मोठ्या दुकानांचा आसरा घेतला. बच्चेकंपनीने पावसात भिजण्याचा मनसोक्त आनंद घेतला. परिसरातील डोंगरमाथ्यावर धुक्‍याची दुलई पसरली होती. बाजार परिसरात ऐनवेळी छत्री, रेनकोट घेण्याकरिता गर्दी उसळली होती. 

पंचायत समिती, तहसील कार्यालय, रेल्वे, बसस्थानक परिसरात शुकशुकाट दिसून आला. मोसमाच्या पहिल्याच पावसात शहरातील अवास्तव घनकचऱ्यामुळे नाले, गटारी मोठ्या प्रमाणात तुंबल्या होत्या. त्यामुळे सरकारी कामांचे चांगलेच पितळ उघडे पडले. नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला. तब्बल दोन ते अडीच तास मुसळधारेत बाजारपेठेत नागरिकांसह व्यापाऱ्यांचीही पळापळ झाली, तर विद्यार्थ्यांनाही आडोशाला उभे राहून पाऊस उघडण्याची वाट पाहावी लागली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rains in Igatpuri taluka