दुचाकींची चोरी केल्याप्रकरणी उच्चशिक्षित तरुण ताब्यात 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जुलै 2018

नाशिकच्या अंबड पोलिस ठाण्यातून तीन उच्चशिक्षित तरुणांना दुचाकी चोरीप्रकरणी ताब्यात घेतले आहे.

चाळीसगाव - शहरातील दुचाकींच्या झालेल्या चोरीप्रकरणी येथील पोलिसांनी नाशिकच्या अंबड पोलिस ठाण्यातून तीन उच्चशिक्षित तरुणांना ताब्यात घेतले आहे. या तिघांनी चाळीसगाव शहरातून दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे तिघांकडून आणखी काही चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तविली आहे. 

पोलिसांनी सांगितले की, नाशिक येथील अंबड पोलिसांनी दुचाकी चोरीप्रकरणी उमेश युवराज मोरे (रा. धुळे ह. मु नाशिक), आकाश अशोक मराठे (रा. चाळीसगाव, ह. मु. नाशिक) व राहुल सुभाष वाघ (रा. शिरपूर, ह. मु. नाशिक) या तिघांना ताब्यात घेतले होते. पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी नाशिकसह चाळीसगाव व धुळे येथूनही दुचाकी लंपास केल्याची कबुली दिली. चाळीसगाव पोलिसांना समजताच त्यांनी नाशिक पोलिसांशी संपर्क साधून तिघांना चौकशीकामी चाळीसगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

'फेसबुक'च्या माध्यमातून झाली मैत्री -
या गुन्ह्यातील आकाश मराठे, उमेश मोरे व राहुल वाघ हे तिघेही उच्च शिक्षित आहेत. एक अभियांत्रिकी तर दोन 'डीएमएलटी'ची पदवी घेत आहेत. या तिघांचीही फेसबुकच्या माध्यमातून मैत्री झाली व त्यांनी दुचाकी चोरून मजा मारण्याची युक्‍ती शोधून हा उद्योग सुरू केला. चाळीसगावातून कोणाकोणाच्या दुचाकी या तिघांनी चोरल्या याचा तपास पोलिस करीत आहेत. अधिक तपास हवालदार अरुण पाटील करीत आहेत.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Highly educated young boys arrested for theft of two wheelers