होमगार्डची आता वेतनावर नियुक्ती

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 जून 2019

सदस्यांना असे आहे मानधन
सध्या या सदस्यांना आवश्‍यकता भासल्यास ड्यूटी दिली जाते, त्यासाठी ड्यूटीच्याच दिवसाचे प्रतिदिन ५६० रुपये मानधन आणि १२ तासांपेक्षा अधिक काळ ड्यूटी झाल्यास १०० रुपये अल्पोपाहार भत्ता दिला जातो. वर्षातून केवळ ७०-८० दिवसच त्यांना ड्यूटी दिली जाते, त्यामुळे या सदस्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न कायम आहे.

जळगाव - गेल्या सात दशकांपासून होमगार्ड संघटनेत जिल्ह्याचे प्रमुख म्हणून सेवा देणाऱ्या जिल्हा समादेशकाचे पद आता वेतनी करण्यात आले असून, त्यासाठी लवकरच भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यासाठी एक अशा ३४ पदांच्या निर्मितीस मंजुरीचा महत्त्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला.

आपत्कालीन व्यवस्थेसह कायदा- सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने सेवा देणाऱ्या या संघटनेसाठी हा मोठा व स्वागतार्ह निर्णय असून, संघटनेतील सर्व सदस्यांनाही मानसेवी तत्त्वावर न ठेवता निश्‍चित वेतनावर नियुक्तीची मागणी अद्याप कायम आहे. 

१९४६ मध्ये होमगार्ड संघटनेची स्थापना झाली. सुरवातीच्या काही दशकांमध्ये आपत्कालीन स्थितीत होमगार्ड सदस्यांची मदत घेतली जायची. नंतर या संघटनेचे स्वरूप बदलून आता तर कायदा- सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस, निमलष्करी जवानांना मदत म्हणून होमगार्डचे सदस्य सेवा देतात. 

दोन वर्षांपूर्वी प्रस्ताव
अगदी स्थापनेपासूनच या संघटनेचे प्रमुख म्हणून जिल्हा समादेशक निःशुल्क सेवा देत आले आहेत. त्यांना मानधनही देण्यात येत नव्हते. दोन वर्षांपूर्वी महासमादेशकांनी गृह विभागाला जिल्हा समादेशक पद वेतनी करण्यात यावे, यासंबंधीचा प्रस्ताव दिला. सरकारने त्या संदर्भात एक समिती नेमली. समितीने अहवाल दिल्यानंतर तीन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीत जिल्हा समादेशक हे पद वेतनी करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि गुरुवारी (ता. २०) याबाबत अध्यादेश काढण्यात आला.

पद अन्‌ वेतनश्रेणी
या निर्णयानुसार प्रत्येक जिल्ह्यासाठी एक अशी ३४ जिल्हा समादेशक (गट अ) पदे नव्याने निर्माण करण्यात आली आहेत. त्यांना सहाव्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी १५,४००- ३९,१०० (ग्रेड वेतन रुपये ५४००) या स्वरूपाचे वेतन निश्‍चित करण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Home Guard now employees a wallet