वट पौर्णिमेदिवशी दारूसाठी पतीकडून पत्नीची हत्या 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 जून 2018

करगावात दारुची खुलेआम विक्री 
​करगाव तांडा परिसरात बहुसंख्य ऊस तोड कामगारांसह मोलमजुरी करणाऱ्यांचे वास्तव्य आहे. गावात गेल्या अनेक दिवसांपासून गावठी दारु सर्रासपणे विक्री होत आहे. त्यामुळे अनेक जण दारुच्या आहारी गेले आहेत. येथील यात्रा तालुक्‍यात प्रसिद्ध असून यात्रेदरम्यानही दारुची विक्री होत असते. दारुमुळे अनेकांचे संसार उद्‌ध्वस्त झाले आहेत. आजची घटना देखील दारुमुळेच झाल्याने गावातील दारु विक्रेत्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

चाळीसगाव : जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून एकीकडे विवाहिता वटसावित्री पौर्णिमेनिमित्त वडाच्या झाडाची पूजा करीत असताना दुसरीकडे पतीला दारू पिण्यासाठी पत्नीने पैसे दिले नाही म्हणून पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना करगाव तांडा क्रमांक 4 (ता. चाळीसगाव) येथे आज सकाळी आठच्या सुमारास घडली. संशयित पतीला पोलिसांनी अटक केली आहे. 

पोलिसांनी सांगितले, की करगाव तांडा क्रमांक 4 येथे आत्माराम जाधव हा पत्नी सखूबाई व चार मुलांसोबत राहतो. त्यांची मुलगी विवाहीत असून ती सासरी आहे. आत्माराम कधीतरी कामधंदा करायचा मात्र, त्याला दारूचे व्यसन होते. आज सकाळी सातच्या सुमारास त्याची पत्नी संगीता उर्फ सखूबाई ही घरात पाणी तापवत होती. आत्मारामने पत्नी संगीताकडे दारूसाठी पैशांची मागणी केली. संगीताने पैसे देण्यास नकार दिल्याने त्यांच्यात जोरदार भांडण झाले. पती- पत्नीचा वाद विकोपाला गेल्याने आत्मारामने त्याच्या हातातील लोखंडी सळई रागाच्या भरात पत्नी संगीताच्या डोक्‍यात मारली. त्यामुळे संगीताच्या डोक्‍याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणावर रक्‍तस्राव झाल्याने तिला चाळीसगाव येथील मातोश्री हॉस्पीटलमध्ये दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर देवरे हॉस्पिटल येथे उपचारार्थ दाखल केले असता, डॉक्‍टरांनी तिला मृत झाल्याचे घोषित केले. 

पतीची गुन्ह्याची कबुली 
घटना घडल्यानंतर आरोपी पती आत्माराम जाधव हा स्वतः ग्रामीण पोलीस ठाण्यात आला व त्याने आपण पत्नीला ठार मारल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रमेश मानकर यांच्यासह हवालदार किशोर पाटील, बिभिषण सांगळे, भावराव पाटील आदी करीत आहेत. 

आठ महिन्यांपूर्वीच आले करगावात 
संगीता व आत्माराम या दांम्पत्याला पाच अपत्य आहेत. पैकी मुलीचे लग्न झाले असून तिला मुंबईला दिले आहे. उर्वरीत चारही मुले लहान आहेत. संगीता व आत्माराम हे मुंबईला कामधंदा करून आपला उदरनिर्वाह करायचे. मोठे कुटुंब असल्याने त्यांना मुंबईत परवडत नव्हते. त्यामुळे ते आपल्या मूळगावी करगावला आठ महिन्यांपूर्वी आले होते. आत्माराम कधीतरी एखाद्या ढाब्यावर कामाला जायचा. त्याला दारूचे व्यसन जडल्याने दारुमुळेच त्याने पत्नीची हत्या केली. 

करगावात दारुची खुलेआम विक्री 
करगाव तांडा परिसरात बहुसंख्य ऊस तोड कामगारांसह मोलमजुरी करणाऱ्यांचे वास्तव्य आहे. गावात गेल्या अनेक दिवसांपासून गावठी दारु सर्रासपणे विक्री होत आहे. त्यामुळे अनेक जण दारुच्या आहारी गेले आहेत. येथील यात्रा तालुक्‍यात प्रसिद्ध असून यात्रेदरम्यानही दारुची विक्री होत असते. दारुमुळे अनेकांचे संसार उद्‌ध्वस्त झाले आहेत. आजची घटना देखील दारुमुळेच झाल्याने गावातील दारु विक्रेत्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: husband killed wife in Chalisgoan