मालमत्तांच्या मूल्यांकनासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना डांबले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

इगतपुरी - प्रस्तावित नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गातील मालमत्तांचे मूल्यांकन करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना तळोशी (ता. इगतपुरी) येथील शेतकऱ्यांनी डांबून ठेवले. तब्बल चार तासांनंतर समृद्धी महामार्गाला आपला विरोध असल्याबाबतचे निवेदन देऊन त्यानंतर या अधिकाऱ्यांच्या पथकाला सोडण्यात आले.

इगतपुरी - प्रस्तावित नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गातील मालमत्तांचे मूल्यांकन करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना तळोशी (ता. इगतपुरी) येथील शेतकऱ्यांनी डांबून ठेवले. तब्बल चार तासांनंतर समृद्धी महामार्गाला आपला विरोध असल्याबाबतचे निवेदन देऊन त्यानंतर या अधिकाऱ्यांच्या पथकाला सोडण्यात आले.

महामार्गासाठी संपादित करावयाच्या जमिनींचे तातडीने मूल्यांकन करून त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिले आहेत. त्यानुसार आज एक पथक तळोशी येथे मूल्यांकनासाठी आले होते. या पथकास चार तास डांबून ठेवत शेतकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला. महामार्गाच्या भूसंपादनास काही गावांतून कमालीचा विरोध होत असून, त्यातच प्रशासनाने थेट जमीन खरेदीसाठी दर जाहीर केले आहेत; मात्र संबंधित जमिनींचे मूल्याकन अद्याप करण्यात आलेले नाही.

इगतपुरी तालुक्‍यातील अनेक शेतकरी महसूल यंत्रणेशी याअनुषंगाने चर्चाही करत आहेत. त्यातच जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर मालमत्तांच्या मूल्यांकनाचे काम सुरू झाले आहे; मात्र प्रत्यक्ष कार्यवाही करण्यासाठी जाणाऱ्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

"वेळोवेळी ग्रामसभेचे ठराव, हरकतींद्वारे आम्ही शासनाकडे विरोध नोंदविला आहे. आम्हाला जमिनी द्यायच्याच नाहीत. तरीही शासन सर्वेक्षणाचा घाट घालून शेतकऱ्यांचा विश्‍वासघात करत आहे. सार्वजनिकमंत्र्यांसोबत चर्चा करून जोपर्यंत तोडगा काढला जात नाही, तोपर्यंत प्रक्रिया थांबवावी, असेही आम्ही कळविले आहे. तरीही शासनाने सर्वेक्षणासाठी अधिकारी पाठवले, म्हणजेच हे दुटप्पी धोरण असून, याचा आम्ही निषेध करतो'
-- भास्कर गुंजाळ, सचिव, शेतकरी संघर्ष कृती समिती.

Web Title: igatpuri nashik news The officers who have been assessing the property