शैक्षणिक प्रमाणपत्र डिजिटल स्वरूपात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 फेब्रुवारी 2018

इगतपुरी - सुरक्षितता आणि पारदर्शकता वाढण्यास मदत होण्याच्या उद्देशाने ब्लॉक चेन या अत्याधुनिक तंत्राचा वापर करून शैक्षणिक प्रमाणपत्रेही आता डिजिटल स्वरूपात दिली जाणार आहेत. पुढील वर्षी पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारची प्रमाणपत्रे दिली जातील. या तंत्रज्ञानामुळे बोगस किंवा बनावट प्रमाणपत्रे तयार करण्याचे प्रकार जवळपास बंद होण्यास मदत होणार आहेत. ब्लॉक चेनला "इंडिया चेन' असे नाव देण्यात आले असून, निती आयोग यावर काम करत आहे.

हे तंत्रज्ञान विकसित झाल्यानंतर आयआयटी-पवई, तसेच दिल्ली विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयामधून प्रायोगिक तत्त्वावर याचा वापर सुरू केला जाईल व यानंतर हळूहळू याचा सर्वत्र वापर केला जाणार असून, 2019 च्या शैक्षणिक वर्षापासून "इंडिया चेन' तंत्रावर आधारित डिजिटल प्रमाणपत्रे देशभरात दिली जातील, अशी योजना आहे. या प्रमाणपत्रांसाठी ऍप आणि व्हेरिफिकेशनची आवश्‍यकता असते.

काय आहे तंत्रज्ञान?
कामकाजात पारदर्शकता तसे सुरक्षितता आणण्यासाठी या तंत्राचा वापर केला जातो. डिस्ट्रिब्युटेड लेजर टेक्‍नॉलॉजी असे या तंत्राचे मूळ स्वरूप आहे. नेटवर्क कॉम्प्युटरमध्ये डेटा भरताना या संदर्भातील प्रत्येकालाच त्यात सहभाग घ्यावा लागतो. सर्वांचा डेटा भरून झाला, की एकमताने सर्व ट्रान्झॅक्‍शनला मंजुरी दिली जाते. यानंतर सगळाच डेटा क्रिप्टोग्राफीने सुरक्षित केला जातो. बिटकॉइनसारख्या आभासी चलनासाठी या तंत्राचा वापर केला जातो. याशिवाय पेमेंट सर्व्हिस कृषी, वित्तीय सेवा आदींसाठीही ब्लॉक चेनचा उपयोग सुरू आहे.

सरकारी कामकाजात उपयोग
सरकारी कामकाजात ब्लॉक चेनचा उपयोग सुरू करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. पारदर्शकता आणि वेग आणण्याबरोबरच पैशाची बचतदेखील या तंत्रामुळे होऊ शकते. या संदर्भात निती आयोगाने नोव्हेंबरमध्ये परिषदही घेतली. महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरातने ई-गव्हर्नन्ससाठी या तंत्राचा वापरही सुरू केला. याशिवाय अनेक बॅंकांनी आपल्या कामकाजात ब्लॉकचेन तंत्र वापरले आहे. यामुळे बॅंकिंग तंत्रज्ञानात सुरक्षितता आणि पारदर्शकता वाढण्योस मदत होणार आहे.

Web Title: igatpuri news nashik news educational certificate digital