मनमाड रेल्वेस्थानकावर अवैध खाद्यपदार्थ विकणाऱ्या टोळ्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 मार्च 2017

मनमाड - शहराची ओळख असलेल्या मनमाड जंक्‍शन रेल्वेस्थानकावर व धावत्या गाडीत रेल्वे प्रशासन, रेल्वे सुरक्षा दल, लोहमार्ग रेल्वे पोलिस यांच्या आशीर्वादाने अवैध खाद्यपदार्थ विक्री सुरू आहे. या अवैध खाद्यपदार्थ विक्रीची टोळी चालवणाऱ्या महाबलींची रेल्वेस्थानकावर मोठी दहशत आहे. त्यामुळे येथील रेल्वेस्थानक गुन्हेगारीचा अड्डा बनला आहे. हप्त्याची मोठी मलई मिळत असल्याने प्रशासन कारवाई करायला तयार नाही. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी लक्ष घालून मनमाड जंक्‍शन अवैध धंदेमुक्त करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष हबीब शेख यांनी निवेदनाद्वारे केली.

आता मनमाडची ओळख तेथे चालणाऱ्या खाद्यपदार्थांच्या अवैध विक्रीच्या मोठ्या धंद्यामुळे आहे. या रेल्वेस्थानकावर तसेच स्थानकावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये भुसावळ ते इगतपुरीपर्यंत चालणारा मोठा व्यवसाय आहे. खाद्यपदार्थ तसेच शीतपेय, फळे, सुकामेवा, गुटखा, तंबाखू, सिगारेट आदी अवैध पदार्थ विक्रीचे मोठे जाळे आहे. कोणताही परवाना नाही; केवळ रेल्वे प्रशासन, रेल्वे सुरक्षा दल, लोहमार्ग रेल्वे पोलिस यांना हप्ते दिले, की कोणीही अनधिकृत पदार्थ विक्रीचा व्यवसाय करू शकतो. भुसावळच्या विभागीय व्यवस्थापक ते मुंबईच्या महाव्यवस्थापकांपर्यंत, तसेच रेल्वे पोलिस, रेल्वे सुरक्षा दलाच्या नागपूर कार्यालय ते मुंबई कार्यालयापर्यंत हप्त्याचे सेटिंग आहे. त्यामुळे लाखो रुपयांची उलाढाल येथे होते. मूळ किमतीच्या चारपट जादा दराने प्रवाशांना वस्तू विक्री केल्या जातात. याबाबत प्रवाशांनी तक्रार अथवा विचारणा केली, तर अरेरावीची भाषा वापरत मारझोड केली जाते. प्रवाशांना देण्यात येणारे अन्न शिळे आहे की ताजे, याची साधी तपासणीदेखील होत नाही. तक्रार केली तरी अशा अवैध खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कारवाई होत नाही. कारवाई अथवा तपासणी होण्यापूर्वीच प्रशासनाकडून टीप दिली जाते. यामुळे हे अनधिकृत विक्रेते व्यवसायच बंद ठेवतात आणि अधिकारी जाताच पुन्हा धंदे सुरू होतात.

या अनधिकृत धंद्यांमुळे जे अधिकृत विक्रेते आहेत, त्यांच्या धंद्यांवर मोठा परिणाम होतो. अवैध धंद्यांची लाखो रुपयांची उलाढाल असल्याने येथे धंदा करण्याची चढाओढ असते. अनधिकृत धंदा करणाऱ्या बाहुबलीकडून टोळी चालविली जाते. एका टोळीत दोनशे ते तीनशे लोक व्यवसाय करतात. या अवैध धंद्यातही मोठी स्पर्धा असल्याने अनेकदा टोळ्या तयार झाल्या आहेत. यातून स्थानकावरच दंगली होतात. तरी प्रशासन दखल घेत नाही. काही वेळा तर प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवरदेखील हल्ले झाले आहेत. येथे चोरीचे रॅकेटदेखील चालविले जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे. 

एकीकडे मोदी सरकार आणि रेल्वेमंत्री सुरेश प्रभू रेल्वेस्थानकावर प्रवाशांना सुरक्षेची हमी देत आहे. स्वच्छ व स्वस्थपूर्ण अन्न, पेय देण्याचा संकल्प करत आहे. मात्र, या गोष्टीला मनमाड रेल्वेस्थानक अपवाद आहे. 

मनमाडपासून नागपूर ते मुंबई अशी हप्त्याचे वाटप होत असल्याने येथील अनधिकृत खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय, तसेच गुन्हेगारी बंद करणे मुश्‍कील असल्याचे बोलले जाते.

Web Title: Illegal food selling on Manmad railway station