
अवैध बायोडिझेलची जोमाने विक्री; विक्रेत्यांना अभय कोणाचे?
खापर (जि. नंदुरबार) : अक्कलकुवा तालुक्यातील बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावरील वाण्याविहीर ते पेचरीदेवदरम्यान बायोडिझेलची अवैध विक्री पुन्हा जोमाने सुरू झाली आहे. वृत्तपत्रांतील बातम्यांनंतर दोन दिवस ‘ड्राय डे’ मनवून पुन्हा बायोडिझेलची दिवसाढवळ्या अवैध विक्री सुरू झाली. महसूल व पोलिस विभागाच्या दुर्लक्षामुळे सर्रास विक्री सुरू झाली आहे. वरकमाईमुळे कर्तव्यही खुंटीला टांगल्याचे चित्र आहे. अवैध बायोडिझेल विक्रीचा विषय तालुक्यात चर्चेत असताना संबंधित अधिकारी कारवाई का करीत नाहीत, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे अवैध बायोडिझेल विक्रीला नेमके अभय कोणाचे, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
हेही वाचा: चांदीच्या दरात पुन्हा 3 हजारांची घसरण; सोनेही घसरले
कायदा व सुव्यवस्था फक्त सर्वसामान्यांसाठी असते का? एकेकाळी अक्कलकुवा तालुक्यात कायद्याचे राज्य होते, अपराध्यांना कायद्याचा वचक होता, पण वरकमाईच्या लालसेपोटी अक्कलकुवा तालुक्याला अवैध धंद्याची राजधानी होण्याच्या मार्गावर नेऊन ठेवले आहे. तालुका प्रशासनाची खुली सूट असल्याने अवैध धंदे करणाऱ्यांना बळ मिळत आहे.
कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करून पेट्रोलपंपाचा व्यवसाय सुरू आहे. पेट्रोल-डिझेलच्या विक्रीमुळे होणाऱ्या व्यवहारात शासनाला मोठ्या प्रमाणात कर मिळतो, पण अक्कलकुवा तालुक्यात सुरू असलेल्या अवैध बायोडिझेलच्या विक्रीमुळे येथील पंपचालकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामागे अधिकाऱ्यांचे ‘अर्थकारण’ दडल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. काही नागरिकांच्या तक्रारीनंतर अवैध बायोडिझेलचा घोळ वृत्तपत्रांनी चव्हाट्यावर आणला. त्यामुळे हा प्रकार उघड झाला आहे. मात्र तालुका प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याने या व्यावसायिकांना खुली सूट मिळाली आहे. जिल्हाधिकारी आता लक्ष घालतात का, याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.
हेही वाचा: ग्रामविकास अधिकाऱ्यास लाच घेताना अटक; ACBची कारवाई
Web Title: Illegal Sale Of Biodiesel In Nandurbar District News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..