'आयएमए' बजावणार डॉ. लहाडेंना नोटीस

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 एप्रिल 2017

नाशिक - इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) नाशिक शाखेचा पदग्रहण सोहळा उद्या (ता. 6) होत असून, नवीन कार्यकारिणीत डॉ. वर्षा लहाडे यांचा समावेश आहे. डॉ. लहाडे यांच्यावर बेकायदा गर्भपाताचा आरोप असल्याने त्यांनी कार्यकारिणीपद स्वीकारू नये, तसेच आपले म्हणणे आठ दिवसांत "आयएमए' पुढे मांडावे, अशी नोटीस बजावणार असल्याची माहिती नवनियुक्‍त अध्यक्ष डॉ. मंगेश थेटे यांनी दिली. "आयएमए'चे राज्याचे अध्यक्ष डॉ. अशोक तांबे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत सदस्यत्व रद्द करण्यासंदर्भातील निर्णय घेतला जाणार असल्याचेही समजते.

डॉ. थेटे म्हणाले की, "आयएमए'च्या घटनेनुसार एखाद्या डॉक्‍टरांवर आरोप झाल्यास संबंधितांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी दिला जातो. त्याप्रमाणेच डॉ. लहाडे यांनाही नोटीस बजावण्यात येईल. त्यांनी आठ दिवसांत म्हणणे मांडले नाही किंवा त्यांचा खुलासा असमाधानकारक असल्यास त्यांच्यावर नियमानुसार कारवाई केली जाईल. आरोग्य विभागाच्या कारवाईवरही संघटनेचे लक्ष आहे. गंभीर आरोपांमुळे त्यांचे "आयएमए'चे सदस्यत्व रद्द करण्याची कारवाई होऊ शकते.''

"इथिकल सेल'ची निर्मिती
डॉक्‍टरी व्यवसाय अधिक पारदर्शक बनविण्यासाठी, या क्षेत्रातील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी "आयएमए'च्या अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली "इथिकल सेल'ची स्थापना करण्यात येईल. शहरातील ज्येष्ठ डॉक्‍टरांचाही समितीत समावेश असेल. या समितीमार्फत युवा डॉक्‍टरांचे समुपदेशन केले जाईल, अशी माहिती नियोजित अध्यक्ष डॉ. आवेश पलोड यांनी दिली.

Web Title: ima gives to dr. varsha lahade notice