तात्काळ कायमस्वरूपी अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी: महाराणा प्रताप क्रांतीदल

Immediate appoint permanent officials demands Maharana Pratap Krantinath
Immediate appoint permanent officials demands Maharana Pratap Krantinath

सटाणा : बागलाणच्या गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी व इतर शासकीय अधिकाऱ्यांची पदे गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त आहेत. यामुळे सर्वसामान्य जनतेची कामे खोळंबली असून तालुका अनेक शासकीय योजनांपासून वंचित आहे. या रिक्त पदांवर तात्काळ कायमस्वरूपी अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय बागलाण तालुका महाराणा प्रताप क्रांतीदल संघटनेचे तालुकाध्यक्ष लखन पवार यांच्या नेतृत्वाखाली आज राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या जयंतीदिनी मंगळवार (ता. 2) पासून पंचायत समितीच्या प्रवेशद्वारात बेमुदत उपोषण छेडण्यात आले.  

बागलाण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे हे गेल्या सहा महिन्यांपासून रजेवर गेले असून तालुका कृषी अधिकारी दिलीप कापडणीस यांची पाच महिन्यांपूर्वी इतरत्र बदली झाली आहे. तसेच पंचायत समितीतील सहाय्यक गटविकास अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी भाग 1 व 2, कक्ष अधिकारी, पशुधन विभागाचे विस्तार अधिकारी, सांख्येकी विस्तार अधिकारी आदी पदेही रिक्तच आहेत. त्यामुळे तात्पुरत्या नियुक्तीवर आलेल्या इतर अधिकाऱ्यांकडे हा पदभार सुपूर्द करून कारभार कसाबसा सुरु आहे. परिणामी तालुक्यातून शासकीय कामकाजानिमित्त येणाऱ्या सर्वसामान्य जनतेची अनेक कामे खोळंबली आहेत.

बागलाण तालुक्याचा विस्तार मोठा असल्याने कामाची व्याप्तीही मोठी आहे. प्रभारी अधिकारी दुपारी ३ ते ४ वाजेनंतर कार्यालयात येतात. प्रभारी असल्यामुळे तालुक्यातील मोठे निर्णय त्यांना घेता येत नाहीत. त्यामुळे रोजगार हमी योजना, पिण्याच्या पाण्यासाठी टँकर मंजुरी, घरकुल आवास योजना, अवजारे वाटप, सार्वजनिक आरोग्य, पाणीपुरवठा, आशा प्रकल्प, अंगणवाडी, पोषण आहार व अनेक कामांना मंजुरी देण्यास हे प्रभारी अधिकारी टाळाटाळ करतात. खेड्यापाड्यातून समस्या घेऊन येणाऱ्या लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांना प्रमुख अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने आपल्या समस्या न सोडविता माघारी जावे लागते व गावातील जनतेच्या रोषास सामोरे जावे लागते.

ता. 5 सप्टेंबर ला महाराणा प्रताप क्रांतीदल संघटनेतर्फे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना निवेदन देऊन उपोषणाचा इशारा दिला होता. मात्र गेल्या महिन्याभरात प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्याने पदाधिकाऱ्यांनी आज उपोषणास सुरुवात केली. जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही, अशी ठोस भूमिका संघटनेचे तालुकाध्यक्ष लखन पवार यांच्यासह उपोषणकर्त्यांनी घेतली आहे. उपोषणात जिल्हाध्यक्ष नानाभाऊ मोरकर, भावसिंग पवार, कार्याध्यक्ष भावसिंग पवार, जयेश जाधव, प्रभाकर पवार, गोकुळ पवार, जितेंद्र सूर्यवंशी, साहेबराव पवार, शाम पवार, सुरेश जाधव, भिका ठोमसे, दीपक ठोके, संजय ठोके, नवल दात्रे, प्रीतम जाधव, सुरेश पवार, चेतन सोनवणे, शरद गिरासे, सोमनाथ परदेशी, संजय पवार, नथा ठोके, दीपक जाधव, रवींद्र पवार, राजेंद्र पवार, पंकज दात्रे, छोटू पवार आदी सहभागी आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com