अनैतिक संबंधातून हमाल तरुणाचा खून? 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 मार्च 2017

नाशिक - दिंडोरी रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमाली करणाऱ्या तरुणाचा शनिवारी (ता. 4) रात्री निर्घृण खून झाल्यानंतर पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले. पोलिस आणखी तिघांचा शोध घेत असून, अनैतिक संबंधातून खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

नाशिक - दिंडोरी रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमाली करणाऱ्या तरुणाचा शनिवारी (ता. 4) रात्री निर्घृण खून झाल्यानंतर पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले. पोलिस आणखी तिघांचा शोध घेत असून, अनैतिक संबंधातून खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

पेठ नाक्‍याजवळील हॉटेल उत्तम हिरा (गोंधळ)समोर ही घटना शनिवारी रात्री सव्वाअकरा ते साडेअकराच्या सुमारास घडली. बाजार समितीत हमाली करणारा दीपक दगडू अहिरे (वय 29, रा. निलगिरी बाग, औरंगाबाद रोड) काम आटोपून दुचाकी (एमएच 15, सीएच 6373)वरून घराकडे जाण्यासाठी निघाला असता त्याच वेळी अचानक चार ते पाच संशयितांनी त्याच्यावर हल्ला केला. त्याच्या डोळ्यात मिरचीपूड फेकली आणि त्यानंतर त्याच्या पाठीवर धारदार शस्त्रांनी वार केले. दीपकच्या पाठीवर तब्बल 16 गंभीर वार केल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या बरगडीत एक चाकूही अडकला होता. 

ही घटना परिसरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, पंचवटी पोलिसांनी सीसीटीव्ही फुजेट ताब्यात घेतले आहे. त्यानुसार पाच संशयितांनी दीपकवर हल्ला केला असून, त्यावरून पोलिस संशयितांच्या मागावर आहेत. दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, तिघांचा पोलिस शोध घेत आहेत. दरम्यान, हल्ला करणारे संशयितही हमाली काम करणारे असून, ते दीपकचे मित्रच असल्याची चर्चा आहे. 

दीपक अहिरे याचे घटस्फोटित महिलेशी अनैतिक संबंध होते. ही बाब त्याच्या अन्य साथीदारांना खटकत होती. त्यातून त्यांच्यात वाद झाल्याचीही शक्‍यता आहे. याच अनैतिक संबंधातून संशयितांनी दीपकवर हल्ला केला असावा, असा कयास लावला जात आहे. संशयितांच्या अटकेनंतर सत्य परिस्थिती समोर येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

Web Title: Immoral transmitted youth murder