नंदुरबारच्या कुणालची आकाशाला गवसणी | Nandurbar News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हैदराबाद विमानतळावर उड्डाणासाठी सज्ज झालेला पायलट कुणाल नितीन पवार

नंदुरबारच्या कुणालची आकाशाला गवसणी

नंदुरबार : जिद्द, मेहनत आणि अभ्यासाचा जोरावर नंदुरबारसारख्या आदिवासी, अतिदुर्गम भागातील एका जिल्हा परिषदेच्या शिक्षकाचा मुलाने पायलट होऊन आकाशाला गवसणी घालायची जिद्द मनात धरली आणि ती खरतड प्रशिक्षणानंतर प्रत्यक्षात उतरविल्याचे उदाहरण नंदुरबार येथील कुणाल नितीन पवार या युवकाचे आहे. ते इतर तरुणांसाठी नक्कीच आदर्शवत ठरणारे आहे. जिल्ह्यातील पहिला पायलट होण्याचा बहुमान त्याने मिळविला आहे.

येथील जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक नितीन पवार व सुनीता पवार यांचा कुणाल हा मोठा मुलगा आहे. कुणालचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण नंदुरबारमध्येच झाले. त्यानंतर अकरावी- बारावीचे शिक्षण औरंगाबाद येथील सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण केंद्रात घेतले. भौतिकशास्त्र विषयात बी एस्सी पुणे विद्यापीठातून केली.पदवीच्या शेवटच्या वर्षात असताना भारतीय वायुसेना मार्फत घेतल्या जाणाऱ्या परिक्षेत कुणाल पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाला.

त्यानंतर गांधीनगर (गुजरात) येथील वायुसेना ॲकॅडमी पाच दिवसाच्या एस.एस.बी. पूर्ण केली. त्या बॅचमध्ये एकमेव कुणाल पवार याने यश प्राप्त केले. ही विशेष गर्वाची बाब आहे. त्यानंतर डेहराडून येथे वायुसेना ॲकॅडमीमध्ये पायलट पात्रता परिक्षा उत्तीर्ण झाला. तेथून बंगळूर येथे मेडिकल पास करून हैदराबाद येथील वायुसेना ॲकॅडमीत दोन वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण केले. १८ जूनला हैदराबाद येथे पायलट म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली.

यावेळी भारतीय लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे व वायुसेनेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. फायटर विमाने, चॉपर याचे चित्तथरारक कसरती घेण्यात आल्या होत्या. कुणाल पवार याने २१ साव्या वर्षी पायलट होण्याचा बहुमान मिळविला आहे. शेवटी मनात जिद्द व श्रमाची तयारी असली तरी आकाशाला गवसणी घालणे अवघड नाही. याचे जिवंत उदाहरण कुणाल पवार याने आजच्या युवकांसमोर आहे.

"शिक्षकाचा मुलगा शिक्षकच होतो. असे अनेक उदाहरणे आहेत. मात्र कुणाल ने काही तरी वेगळे क्षेत्र निवडावे, असे मला वाटत होते. त्याप्रमाणे मला व त्याचा आईला त्याबाबत सांगण्याची वेळ आली नाही. स्वतःच त्याने देशसेवेत जाण्याची इच्छा दाखविली, त्यानुसार दहावीनंतर त्याची शैक्षणिक वाटचाल सुरू झाली. त्यात त्याला काहीही कमी पडू दिले नाही. त्याचे त्याने आज चीज केले. आम्हाला कुणालचा अभिमान आहे."
- नितीन पवार, प्राथमिक शिक्षक (कुणालचे वडील)

"वायूसेनेत जाण्याचे मी स्वप्न पाहिले होते.वडिलांना सांगितले. त्यांनी त्यासाठी सर्वतोपरी तयारी दर्शविली.मीही जिद्द, आणि अथंह परिश्रम करण्याचा मनोदय केला.त्यामुळे आज पायलट झाले.आजच्या तरुणांनीही देशसेवेत यावे, खूप संधी आहे. फक्त जिद्द,श्रम करण्याची तयारी करावी."
-कुणाल पवार ,पायलट (भारतीय वायु सेना)