त्र्यंबकेश्‍वरमधील दोघांकडे घबाड?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

कारवाई गुलदस्तात : प्राप्तिकर विभागाकडून 44 तास चौकशी

कारवाई गुलदस्तात : प्राप्तिकर विभागाकडून 44 तास चौकशी
नाशिक - बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्‍वर येथील शिखरे व चांदवडकर या दोघांकडे प्राप्तिकर विभागाच्या पथकाने तब्बल 44 तास चौकशी केल्यानंतर आज सकाळी हे पथक माघारी फिरले. या चौकशीत मोठ्या प्रमाणात घबाड मिळाल्याची चर्चा होती. रात्री 2 कोटी 4 किलो सोनं जप्त केल्याचा संदेश सोशल मीडियावर फिरत होता; परंतु सदरच्या चौकशीतून प्राप्तिकर विभागाच्या पथकाच्या हाती कोणत्या स्वरूपाची माहिती लागली, याची अधिकृत माहिती समजू शकलेली नाही. यामुळे प्राप्तिकर विभागाच्या पथकाची कारवाई गुलदस्तातच आहे.

त्र्यंबकेश्‍वर येथील बांधकाम साहित्याचे वितरक विजय गणपत शिखरे आणि इंटेरियल डिझाइनचे व्यावसायिक नीलेश ऊर्फ बन्या चांदवडकर यांच्याकडे सोमवारी (ता. 26) दुपारी प्राप्तिकर विभागाच्या पथकाने अचानक चौकशीसाठी हजेरी लावली. शहरात प्राप्तिकर विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली, तर पौराहित्य करणाऱ्या अनेकांचे या कारवाईमुळे धाबेही दणाणले. प्राप्तिकर विभागाच्या दोन वाहनांतून आलेल्या 12 अधिकाऱ्यांच्या पथकाने मेनरोडवरील नीलेश चांदवडकर यांच्या घरी, तर मंदिराच्या मुख्य रस्त्यावरील विजय शिखरे यांच्या समर्थ निवास या ठिकाणी कारवाई सुरू केली होती.

तब्बल 44 तासांच्या चौकशीनंतर आज सकाळी प्राप्तिकर विभागाचे पथक शहरातून माघारी परतले; परंतु सदरच्या चौकशीतून पथकाला काय गवसले, याची कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. तसेच चांदवडकर व शिखरे यांच्याकडूनही माहिती मिळू शकली नाही. दरम्यान, सदरच्या कारवाईतून आक्षेपार्ह आढळले असल्यास त्यानुसार येत्या काही दिवसांत प्राप्तिकर विभागाकडून पुन्हा शहरातील कर चुकविणाऱ्यांवर छापा पडण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

अफवांचे पीक सुरूच
दरम्यान, प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्याने कालच (ता. 26) सदरची कारवाई चौकशीची असल्याचे स्पष्ट केलेले असतानाही आज शिखरे व चांदवडकर यांच्याकडून पथकाने कोट्यवधी रुपयांचे गबाड व सोने जप्त केल्याची चर्चा सुरूच होती. दोघांवरील कारवाईनंतर सदरचे पथक शहरातील अन्य पुरोहितांवरही छापा टाकणार असल्याची अफवा पसरली होती; परंतु सदरचे पथक आज माघारी निघून गेल्यानंतर अफवांच्या पिकांना पूर्णविराम मिळाला असला, तरीही संबंधितांवरील कारवाईत कोट्यवधींचे गबाड सापडल्याचे संदेश सोशल मीडियावर फिरत होते.

Web Title: income tax raid on shikhare & chandwadkar