नाशिकच्या अवकाशात साहसाचे इंद्रधनुष्य... 

नाशिकच्या अवकाशात साहसाचे इंद्रधनुष्य... 

नाशिक - कारगिल युद्धात वीस वर्षांपूर्वी दिव्यांगत्व वाट्याला आल्यानंतरही खचून न जाता मॅरेथॉनमध्ये धावणाऱ्या, "भारताचा पहिला ब्लेडरनर' असे नामाभिदान मिरवणारे निवृत्त मेजर डी. पी. सिंग यांनी गुरुवारी नाशिकच्या अवकाशात एका ऐतिहासिक कर्तबगारीचे इंद्रधनुष्य रेखाटले. तब्बल नऊ हजार फूट उंचीवरून स्कायडायव्हिंग करून जिद्दीला अवकाशाच्याही सीमा नसतात, हे सिद्ध केले. जवान तसेच देशभरातील युवकांमध्ये साहसाच्या प्रेरणेचा नवा अध्याय लिहिला. 

कृत्रिम पाय असतानाही स्कायडायव्हिंगची ही देशाच्या, तसेच सैन्यदलाच्या इतिहासातील पहिली घटना आहे. लष्कराने 2018 हे वर्ष देशसेवेत असताना अपंगत्व आलेल्या जवानांना समर्पित केले होते. त्यादरम्यान राबविलेल्या विविध उपक्रमांपैकी मेजर सिंग यांचे स्कायडाइव्हिंग हे एक प्रमुख पाऊल होते. लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी 18 मार्चला या साहसी मोहिमेला परवानगी दिली. तेव्हापासून मेजर सिंग व त्यांचे सहकारी येथील लष्करी तळावर या ऐतिहासिक उडीसाठी सराव करीत होते. 

येथील लष्करी तळावरून मेजर सिंग यांना घेऊन लष्कराचे विमान गुरुवारी सकाळी अवकाशात झेपावले. नऊ हजार फूट उंचीवरून मेजर सिंग यांनी पॅराशूटच्या साहाय्याने उडी घेतली. ग्लायडिंग करीत नियोजनानुसार त्यांनी जमिनीवर पाय ठेवताच शेकडो जवानांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत केले. लेफ्टनंट कर्नल सर्वेश धडवाल यांनी या मोहिमेचे नेतृत्व केले. त्यांच्या नेतृत्वात भारतीय लष्कराच्या ऍडव्हेंचर विंगचे तज्ज्ञ मार्गदर्शक मेजर सिंग यांच्या मदतीला होते. 

जिद्दी कारगिलवीर 
मेजर सिंग हे कारगिल युद्धावेळी डोग्रा रेजिमेंटमध्ये कार्यरत होते. "ऑपरेशन विजय'मध्ये सहभागी असताना पाकिस्तान सीमेवर अखनूर सेक्‍टरमध्ये तोफगोळ्याच्या स्फोटात मेजर देवेंद्रपाल सिंग गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांचा उजवा पाय गुडघ्याखाली कापून काढावा लागला आणि कृत्रिम पायावर उरलेले आयुष्य काढण्याची वेळ आली. या आघातानंतर खचून न जाता ते कृत्रिम पायाच्या माध्यमातून विविध मॅरेथॉन स्पर्धांमध्ये धावतात आणि सैन्यदलातील अशा दिव्यांग जवानांना प्रेरणा देत राहतात. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com