कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील यांचे जीवन समाजाला प्रेरणादायी : जे. एन. ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 सप्टेंबर 2018

सटाणा : जात-पात आणि धर्माचे अडथळे दूर करत घराघरांत ज्ञानाचा दिवा प्रज्वलित करून बहुजनांना शिक्षणाची दारं खुली करणाऱ्या पद्मभुषण कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील यांचे जीवन समाजाला प्रेरणादायी आहे. आजच्या पिढीने त्यांच्या कार्याचा उपयोग दीपस्तंभाप्रमाणे करावा, असे आवाहन राज्य शासनाचे आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त जे. एन. ठाकरे यांनी आज शुक्रवार (ता.22) रोजी केले.

सटाणा : जात-पात आणि धर्माचे अडथळे दूर करत घराघरांत ज्ञानाचा दिवा प्रज्वलित करून बहुजनांना शिक्षणाची दारं खुली करणाऱ्या पद्मभुषण कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील यांचे जीवन समाजाला प्रेरणादायी आहे. आजच्या पिढीने त्यांच्या कार्याचा उपयोग दीपस्तंभाप्रमाणे करावा, असे आवाहन राज्य शासनाचे आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त जे. एन. ठाकरे यांनी आज शुक्रवार (ता.22) रोजी केले.

चौगाव (ता. बागलाण) येथील रयत शिक्षण संस्थेच्या शरदरावजी पवार माध्यमिक विद्यालयात आज संस्थेचे संस्थापक पद्मभुषण कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ठाकरे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाळासाहेब शेवाळे तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या उत्तर विभाग सल्लागार समितीचे सदस्य शंकर मांडवडे, सरपंच लक्ष्मण शेवाळे, माजी सरपंच राजेंद्र गांगुर्डे, बागलाण विकास मंचचे समन्वयक नंदकिशोर शेवाळे गंगाधर मांडवडे, केवळ शेवाळे, मोठाभाऊ मांडवडे, तुकाराम मांडवडे, रवींद्र मांडवडे, विश्वास शेवाळे, सुनील जगताप आदी उपस्थित होते.

ठाकरे म्हणाले, भाऊरावांनी स्वाभिमान, स्वावलंबन, पराक्रम, पुरुषार्थ व मानवतेची पूजा या पंचसूत्री सद्गुणांचे संस्कार समाजमनावर केले. 'प्रत्येक खेड्यात शाळा असली पाहिजे. विना शाळेचे एकही गाव महाराष्ट्रात असू नये. प्रत्येक नांगरापाठीमागे एक पदवीधर मनुष्य उभा राहिला पाहिजे' असे स्वप्न बाळगून ते प्रत्यक्षात उतरविणारे ते महाराष्ट्राच्या समाज परिवर्तनाच्या चळवळींचा ज्ञानदूत असल्याचेही ठाकरे यांनी स्पष्ट केले. मुख्याध्यापक एम. बी. सिनोरे यांनी प्रास्ताविक केले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते (कै.) भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास ए. डी. सूर्यवंशी, पी. डी. अहिरे, जी. एस. पगार, एस. बी. भोसले, एस. के. कापडणीस, व्ही. डी. भामरे, पी. एन. गांगुर्डे, श्रीमती सोनवणे आदींसह ग्रामस्थ व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. ए. आर. मांडवडे यांनी सूत्रसंचालन केले तर ए. के. कापडणीस यांनी आभार मानले. 

दरम्यान, आज सकाळी गावातून सजविलेल्या ट्रॅक्टरवर कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. अग्रभागी लेझीम व टिपरी नृत्य करणारे विद्यार्थी, डोक्यावर कलश घेत विविधरंगी साड्यांचा पेहराव केलेल्या विद्यार्थिनी हे प्रमुख आकर्षण होते.

Web Title: Inspiring life for Dr. Karmveer Bhaurao Patil to the community : J.N. Thackeray