भाजपमधील अंतर्गत कुरबुरी पुन्हा चव्हाट्यावर 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 मार्च 2017

नाशिक - महापालिका निवडणुकीकरिता एबी फॉर्म मिळविण्यासाठी दोन लाख रुपयांच्या मागणीच्या सोशल मीडियावरील व्हिडिओमुळे भारतीय जनता पक्षाची पुरती नाचक्की झाली असताना निवडणुकीनंतरही पक्षामधील अंतर्गत कलह संपता संपत नसल्याचे आज पुन्हा स्पष्ट झाले. प्रभाग आठमधील भाजपचे उमेदवार अमोल पाटील यांनी आज माध्यमांपर्यंत आमदार सीमा हिरे यांनी पराभव करण्यासाठी कशी फिल्डिंग लावली, याची ऑडिओ क्‍लिप पोचवून पुन्हा पक्षातील कुरबुरी चव्हाट्यावर आणत पक्षावर सोशल मीडियाचा बॉंब डागला. 

महापालिका निवडणुकीत मतदारांपर्यंत पोचण्यास सोशल मीडिया प्रभावी ठरले असले, तरी त्याच सोशल मीडियाद्वारे भाजपला चटके बसू लागले आहेत. दोन लाखांच्या व्हिडिओनंतर सारवासारव करताना नेत्यांची पुरती दमछाक झाली होती. भाजपच्या कामगार आघाडीचे गोपाळ पाटील यांच्या व्हिडिओतही उमेदवारीसाठी पैसे घेतल्याचा आरोप दिसून येत होता. निवडणूक पार पडल्यानंतर पराभवाचे कवित्व सोशल मीडियाद्वारे सुरू झाले आहे. प्रभाग आठमधील भाजपचे उमेदवार पाटील यांनी आपला पराभव आमदार हिरे यांनी विरोधात काम केल्याने झाल्याचा आरोप मतदानानंतर लगेचच केला होता. त्यापाठोपाठ आता पाटील यांनी, हिरेंनी विरोधात कसे काम केले, याची ऑडिओ क्‍लिप सोशल मीडियावर व्हायरल केली. आमदार हिरे एका कार्यकर्त्याशी संवाद साधताना प्रभाग सातमधील भाजपच्या उमेदवार स्वाती भामरे व प्रभाग आठमधील अमोल पाटील यांच्याविरोधात बोलत असल्याचा संवाद आहे. 

ऑडिओ क्‍लिपमधील संवाद 
हिरे- माहीत आहे ना, काय चाललंय ते? 
समोरून- हो सगळं माहीत आहे. 
हिरे- एक मेंबर कट आहे, जॉगिंग ट्रॅकवरही सांगा, 
सर्वांना सांगा, अमोल पाटीलला द्यायचे नाही, दिनकर पाटलाच्या पोराला कोणी ओळखतही नाही. 
हास्य क्‍लबलाही सांगा. 

आमदार सीमा हिरे यांनी भाजपच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी केलेल्या आवाहनावरून त्यांची पक्षनिष्ठा समोर येते. यावरून सर्वसामान्य जनतेने काय अपेक्षा ठेवायच्या? पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणार. 
- अमोल पाटील, भाजपचे पराभूत उमेदवार 

सदरचा आरोप खोटा आहे. ऑडिओ क्‍लिप बनविली आहे. पाटील यांचे बदनाम करण्याचे कृत्य असून, त्याबाबत औरंगाबादमध्ये पक्षनेत्यांसमोर कैफियत मांडणार आहे. 
- सीमा हिरे, आमदार 

Web Title: internal politics in bjp