आयुक्त नांगरे पाटील यांनी सागरच्या डोक्यावर चढवली 'कॅप'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 जून 2019

नाशिकचे पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांनी त्यांच्या डोक्‍यातील 'पी कॅप' काढून सागरच्या डोक्‍यात घातली आणि त्यांच्या हातातील स्टिकही त्याच्या हाती देत 'झालास की आयपीएस', असे म्हणताच सागरचा आनंद गगनात मावेनासा झाला.

नाशिक : आयपीएस होण्याची इच्छा उराशी बाळगून असलेल्या सागरसमोर नियतीने भलतेच काही वाढून ठेवले. ऐन उमेदीच्या काळात असाध्य अशा पायाच्या कर्करोगाशी झगडा त्याला करावा लागतोय. मात्र, अशाही स्थितीमध्ये त्याने शस्त्रक्रियेच्या अवघ्या काही मिनिटे आधी त्याचे आवडते नायक नाशिकचे पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली.

आयुक्तांना याबाबतची कल्पना कळविल्यानंतर, तितक्‍याच तत्परतेने तेही हॉस्पिटलमध्ये दाखल होत सागरची आयपीएस होण्याची इच्छा काही क्षणापुरती का होईना, पण पूर्ण केली. त्यांची आयपीएस कॅप आणि स्टिक सागरच्या हाती देत त्यास कर्करोगावर विजय मिळवून आयएएस अधिकारी होशील, अशा शुभेच्छाही दिल्या.

सागर बोरसे याच्यावर मुंबई नाका येथील मानवता क्‍युरी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. सागर यास पायाचा कर्करोग जडला आहे. त्यामुळे त्याचा एक पाय गुडघ्यापासून काढून टाकण्याची शस्त्रक्रिया होणार होती. या शस्त्रक्रियेमुळे सागरने उराशी बाळगलेले आयपीएस होण्याचे स्वप्न संपुष्टात येणार आहे. परंतु, हे स्वप्न तो ज्या नायकाकडे पाहून पाहत होता, ते नाशिकचे पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांना एक वेळा भेटण्याची इच्छा त्याने डॉ. राज नगरकर यांच्याकडे व्यक्त केली. डॉ. नगरकर यांनी पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना सागरने व्यक्त केलेली इच्छा सांगितली.

नांगरे-पाटील यांनीही कोणताही वेळ न दवडता, तितक्‍याच तत्परते अवघ्या पाच मिनिटांमध्ये मानवता क्‍युरी हॉस्पिटल गाठले आणि सागरची भेट घेतली. विश्‍वास नांगरे-पाटील यांना पाहताच त्याला आश्‍चर्याचा सुखद धक्का बसला. आयुक्तांकडे सागरने आपल्याला आयपीएस अधिकारी व्हायचे होते, असे सांगताच नांगरे पाटील यांनी त्यांच्या डोक्‍यातील 'पी कॅप' काढून सागरच्या डोक्‍यात घातली आणि त्यांच्या हातातील स्टिकही त्याच्या हाती देत 'झालास की आयपीएस', असे म्हणताच सागरचा आनंद गगनात मावेनासा झाला.

यावेळी सागर भावूक झाला होता. त्यावेळी आयुक्त नांगरे-पाटील यांनी त्यास, आयपीएस नाही तरी तू आयएएस अधिकारी होशील. या आजारावर तू यशस्विरित्या मात करून विजयी होशील आणि पुन्हा जोमाने आयएएसचा अभ्यास करशील. त्यासाठी पाहिजे ती मदत मी करीन, असे आश्‍वासन देत त्यास प्रेरणा दिली. यावेळी डॉ. राज नगरकर यांच्यासह हॉस्पिटलमधील डॉक्‍टर्स, कर्मचारी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ips vishwas nangre patil meet cancer patient at nashik