'आयएसओ' वाटचालीला लोकसहभागाचं कोंदण!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 डिसेंबर 2016

शाळा झाल्या बोलक्‍या; "सेतू'मधून अर्जा दिवशी दाखल्याची अन्‌ ग्रामपंचायतींना "रेंज'ची प्रतीक्षा

शाळा झाल्या बोलक्‍या; "सेतू'मधून अर्जा दिवशी दाखल्याची अन्‌ ग्रामपंचायतींना "रेंज'ची प्रतीक्षा
नाशिक - ग्रामपंचायती, सेतू कार्यालये "ऑनलाइन' झाली आहेत. "सेतू'मधून 16 पैकी 7 दाखले अत्याधुनिक सुविधेतून मिळण्याची सोय झाली असली, तरीही अर्जाच्या दिवशी दाखला मिळण्यासह ग्रामपंचायतींना "रेंज'ची प्रतीक्षा कायम आहे. एवढेच नव्हे; तर "आयएसओ'मधून शाळा बोलक्‍या झाल्या असल्याने इंग्रजी माध्यमातील शाळांमधून विद्यार्थी आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेला पसंती देऊ लागले आहेत, हे आशादायक चित्र आहे.

सुशासन दिनाचे औचित्य साधून राज्यभरातील ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्रे, पोलिस ठाणे, अंगणवाड्या, जिल्हा परिषद शाळांसह सेतू कार्यालयांची नेमकी काय स्थिती आहे, याचा मागोवा घेतल्यावर वरील चित्र पुढे आले आहे. पंधरा वर्षांपासून नाशिकच्या सेतू कार्यालयातून सरकारी कामकाजात सुसूत्रता आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ई-महासेवेच्या माध्यमातून संगणकीकृत दाखले देण्यात येत आहेत. डिजिटल स्वाक्षरीमुळे उपजिल्हाधिकाऱ्यांच्या टेबलवरील दाखल्यांचे गठ्ठे कमी झाले आहेत. तसेच नाशिक जिल्हा परिषदेच्या साठहून अधिक शाळांनी "आयएसओ' मानांकन प्राप्त केले आहे. गुरुजनांनी लोकसहभाग घेत परिसर सुशोभिकरणासह विज्ञान, गणिताच्या प्रयोगशाळा उभारण्यात बाजी मारली आहे. ई-लर्निंगची सुविधा अनेक शाळांनी उपलब्ध केली आहे.

पुणे
- जिल्ह्यातील 1200 संस्थांना "आयएसओ' प्रमाणपत्र. अकराशे प्राथमिक शाळा, 57 अंगणवाड्या, 31 ग्रामपंचायती आणि 12 अन्य संस्थांचा समावेश
- कृतीयुक्त अध्ययन पद्धती, ई-लर्निंग, "वुई लर्न इंग्लिश', संगणकीय प्रयोगशाळा आणि प्रत्येक शाळेसाठी स्वतंत्र ग्रंथालय सुविधांवर भर
- "ऑनलाइन' सातबारा उतारा सुविधा मिळाल्या; तलाठ्यांना लॅपटॉप उपलब्ध
- नागरी सुविधा केंद्रांमधून (सेतू) दाखल्यांसाठी "ऑनलाइन' अर्जाची सुविधा
- अंगणवाड्या बोलक्‍या झाल्या असून, लोकसहभागातून 19 कोटींच्या सुविधा
- प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये प्रसूतीचे वाढले प्रमाण

औरंगाबाद
- 3200 पैकी अकराशे अंगणवाड्यांना "आयएसओ'. पुढच्या टप्प्यात 200 अंगणवाड्या होतील "स्मार्ट'
- 861 पैकी 118 ग्रामपंचायती "आयएसओ' प्रमाणपत्रित. संगणकाची सुविधा उपलब्ध
- 50 प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि 279 आरोग्य उपकेंद्रांपैकी 8 आरोग्य केंद्र झाले "आयएसओ' मानांकित
- मराठवाड्यातील एकमेव विशेष मुलांची आश्रमशाळेला "आयएसओ'
- जिल्हा परिषदेच्या 50 शाळांना "आयएसओ'. संगणकासह, पर्यावरणाचे उपक्रम उपलब्ध
- औरंगाबाद ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयांतर्गत 3 पोलिस ठाण्यांना आयएसओ मानांकन
- औरंगाबाद पोलिस आयुक्तालयांतर्गत 15 पोलिस ठाण्यांपैकी 3 पोलिस ठाण्यांना आयएसओ

जळगाव
- जिल्ह्यातील 56 शाळांना "आयएसओ' मानांकन आणि काही शाळांमध्ये डिजिटल क्‍लासरूम
- वाकटुकी (ता. धरणगाव) येथील शाळा कमी पटसंख्येमुळे बंद करण्याचा निर्णय, तरीही गुरुजनांनी मिळवले "आयएसओ' मानांकन
- 10 प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या सेवा "आयएसओ' मानांकित. पातोंडा (ता. चाळीसगाव) आरोग्य केंद्राची सेवा डिजिटल

महापालिकेच्या प्रयोगशील शाळा
नागपूर महानगरपालिकेने दोन शाळांना "आयएसओ' मानांकन मिळवत गुणवत्ता वाढीवर भर दिला आहे. गांधीबागमधील महापालिकेच्या पन्नालाल देवडिया माध्यमिक शाळेत मनोरंजनातून शिक्षणावर लक्ष देण्यात येत आहे. शाळेत 20 संगणक उपलब्ध आहेत. डिजिटल ब्लॅकबोर्ड, विज्ञान प्रयोगशाळा सुरू केली आहे. विद्यार्थ्यांचे दप्तरांचे ओझे कमी करण्याचादेखील प्रयोग होत आहे. विद्यार्थी आणि शिक्षकांनासुद्धा शिस्त लागावी, यासाठी सर्व वर्गखोल्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे; तसेच बॉयोमेट्रिक मशिन आहेत. या उपक्रमांमुळे शाळेला नुकतेच "आयएसओ' मानांकन मिळाले आहे.

Web Title: ISO settingpublic involve way!